

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही कारणास्तव केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. आता योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई- केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती.
परंतु, काही अडचणींमुळे अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीचा शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेच्या लाभापासून एकही महिला वंचित राहू नये, हा प्रत्यक्ष पडताळणीचा हेतू असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.