

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे घनिष्ठ मित्र आहेत,त्यांच्याशी असलेली मैत्री ही कोणत्याही राजकीय तडजोडीचा भाग नसून ती वैचारिक निष्ठा आहे, हिंदुत्व आपला दोघांचा श्वास आहे,मात्र मुंबई महापालिकेचा कौल लक्षात घेता महापौरपद किंवा स्थायी समिती अध्यक्षपद तसेच अन्य महत्त्वाची पदे शिवसेना शिंदे गटाला देणे नागरिकांच्या कौलाला धरून नसेल.भाजपच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्हालाही बघावी लागते, हे समजून घ्या असे त्यांना सांगण्यात आले असल्याचे विश्वसनीय रित्या समजते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच एम एम आर डी ए परिसरातील महापालिकांमध्ये जो कौल मिळालेला आहे त्याचा आदर करण्याचे तत्व अमलात आणणे भाग आहे असे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये याकडे लक्ष दिले जाणार असून तेथील भाजपनेत्यांना आम्ही समजाऊन सांगू असेही समजवण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सर्व संबंधित नेत्यांना हे सांगण्यात आले आहे.आज नवी दिल्ली येथे झालेल्या गाठीभेटींमध्येही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही भूमिका शिंदे यांच्या शिलेदारांना समजावून सांगितली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कल्याण डोंबिवली परिसरात महापौर व्हावा असे वाटते याची पक्षाला कल्पना आहे, त्यांच्या भावनांचा आणि शक्तीचा तेथे आदर केला जाईल मात्र अन्य ठिकाणी तेथील कौल लक्षात घेऊनच पावले टाकले जातील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या नेत्याने यासंबंधीची माहिती पुढारीला दिली.मुंबई महापालिकेसाठी जागावाटप चर्चा सुरू झाली तेव्हा भाजपाने 45 जागा शिंदेगटाला देणे योग्य ठरेल असे सांगितले होते. तशीच आकडेवारी पुढे निकलंनंतर समोर आली आहे. मात्र शिंदे यांच्या शिलेदारांनी धरलेला आग्रह लक्षात घेता 90 पर्यंत जागा दिल्या गेल्या. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात 60 पर्यंत जागा देऊ असे सांगण्यात आले नंतर 75 पर्यंत आकडा नेला मात्र शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीचा मान राखत 90 जागांवर लढण्याची संधी दिली गेली. यातील काही जागा भारतीय जनता पक्षाने लढल्या असत्या तर निकाल वेगळे लागले असते. आपण दोघेही एकत्रपणे काम करतो,करणार आहोत त्यामुळे महापौर पदाचा किंवा महत्त्वाच्या पदांचा आग्रह सोडून द्या. आम्हालाही आमच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य लढण्यास सज्ज ठेवावे लागते असे समजावण्यात आले आहे. महापालिकेतील पदांसंबंधी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांनी केलेल्या चर्चेनंतर शिंदे यांना तसा निरोप दिला गेला आहे असे समजते.
माहितीगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांनीही वास्तव लक्षात घेतल्यानंतरच ताज लँडसेटमध्ये मुक्कामाला असलेले नगरसेवक घरी पाठवण्याचा समजूतदार मार्ग पत्करला आहे.शिंदे यांच्या खासदारांची मते केंद्रातील भाजप सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांच्या मतांचाच नव्हे तर वैचारिक निष्ठेचाही आदर केला जातो.मात्र वारंवार पदे मागणे योग्य कसे ठरेल? ते कसे चालवून घ्यायचे अशी भूमिका महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्र ला कळवली आहे.या घडामोडीनंतर आता समजूतदार भूमिका घेण्याकडे दोन्ही पक्षांचा कल असेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येतो आहे.भारतीय जनता पक्षांनीही शिंदे यांच्या शिवसेनेला जिथे संख्याबळ मिळाले आहे तेथे प्रमुख पदाचा आग्रह धरू नये असाही निर्णय उभय पक्षी झाला असल्याचे समजते.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही कलगीतुरा रंगत असून सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांनी परस्परांच्या ताकदीला ललकारले आहे.र असेच वाद सातत्याने सुरू राहिले तर समजूत घालण्यातच वेळ जाईल. राज्यातील जनतेला सुशासनाची हमी देणार तरी कशी असा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न सवाल आहे. शिंदे गट ही भूमिका समजून घेईल असा विश्वास व्यक्त केला गेला.