Samadhan Sarvankar BJP allegation: भाजपच्या मदतीअभावीच माझा पराभव; समाधान सरवणकरांचा थेट आरोप
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवाला भाजपाला कारणीभूत ठरवत निशाणा साधला आहे. भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव झाला. माझ्याविरोधात विरोधी पक्षांच्या पक्षप्रमुखांची मुले प्रचार करत होती. पण भाजपच्या एकाही नेत्याने मला मदत केली नाही. उलट भाजपाच्या एका टोळक्याकडून माझा प्रचार करू नका, असा अपप्रचार केला जात होता, असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे.
समाधान सरवणकर हे शिंदे गटाचे नेते तथा सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. ते मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 194 मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांनी आपल्या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, माझ्या प्रभागात माझ्या विरोधात 4 ते 5 आमदार प्रचार करत होते. विरोधी बाकावरील दोन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांची मुले माझ्या मतदारसंघात प्रचारात उतरली होती. त्यांचे मुख्य टार्गेट मी होतो. त्यानंतरही मतदार माझ्यासोबत उभे राहिले.
पण माहीम विधानसभेत मला भाजपची कोणतीही मदत झाली नाही. भाजपचे विशिष्ट एक पदाधिकारी होते. त्यांनी सर्वांना सांगितले की, मला मदत करू नका. त्यामुळे आम्हाला माहीममध्ये कुणीही मदत केली नाही. व्हॉट्सॲप चॅटमध्येही भाजपकडून समाधान सरवणकर यांचे काम करायचे नाही, आपल्याला त्यांचा पराभव करायचा आहे, असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला होता.
समाधान सरवणकर पुढे म्हणाले, या टोळीने भाजपच्या शीतल गंभीर यांचाही पराभव कसा होईल, यासाठी काम केले. त्या विजयी झाल्या, तर प्रिया सरवणकर यांच्या पराभवामागेही भाजपची हीच टोळी होती. भाजप असे काही करेल याची कल्पना आम्हाला नव्हती. हीच टोळी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविषयीदेखील घाणेरड्या भाषेत बोलत होती. या टोळीने पक्षाचा आदेश डावलून काम केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमची बाजू मांडणार आहोत.

