

Crime News
लखनौ : शहरातील सालारगंज येथील शिवम ग्रीन सिटीमध्ये खासगी कंपनीत अभियंता असणार्या सूर्य प्रताप सिंह (३२) यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या रत्ना नावाच्या महिलेने त्यांची चाकूने वार करून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यानंतर रत्ना आणि तिच्या दोन्ही मुली साडेपाच तास घरातच राहिल्या. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कोणालाही काही सांगितले नाही. सकाळी ९:४५ वाजता रत्नाने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. या प्रकार उघडकीस असल्याने लखनौ शहरात खळबळ माजली आहे.
सूर्य प्रतापच्या नातवोईकांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सूर्य प्रताप आणि रत्ना यांची ओळख सुमारे १० वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी सूर्य २२ वर्षांचा होता. रत्नाचा पती राजेंद्र हे सरकारी नोकरीत होते. ते जानकीपुरममधील आकांक्षा विहार कॉलनीत त्याची पत्नी रत्ना आणि दोन मुलींसह राहत होते. सूर्य प्रताप हा रत्नाच्या दोन्ही मुलींची शिकवणी घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होता.
सूर्याचे वडील नरेंद्र यांनी सांगितले की, रत्नाच्या पतीचे सुमारे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. त्यानंतर रत्नाने तिच्या कुटुंबाकडे मदत मागितली. ते राहत असलेल्या ठिकाणी भाड्याने घर मागितले. त्यानंतर रत्नाला भाड्याने घर देण्यात आले. सूर्य प्रताप तिथे मुलींची शिकवणी घेत होता. त्याचबरोबर तो एका कंपनीत कार्यकारी अभियंता म्हणूनही काम करत होता.
सूर्य प्रताप आणि रत्ना यांच्यातील जवळीक वाढली. याची कुणकुण लागतच कुटुंबाने रत्नाशी असलेल्या त्याच्या संबंधांबद्दल विचारपूस केली तेव्हा सूर्य प्रतापने कोणत्याही संबंधांना स्पष्टपणे नकार दिला. संशयाच्या आधारे कुटुंबाने त्यांच्या संबंधांना विरोध केला असतासूर्य प्रताप हा घर सोडून रत्नासोबत राहू लागला. गेल्या चार वर्षांपासून सालारगंज शिवम ग्रीन सिटीत तो रत्नाबरोबर राहत होता. रत्नाला तिच्या पतीच्या मृत्यूपासून सुमारे ३०,००० रुपये पेन्शन मिळत होती, जी घराच्या खर्चासाठी वापरली जात होती. सूर्य प्रताप घरखर्चातही मदत करत असे.
हरदोई येथील रहिवासी असलेल्या रत्नाला १७ आणि १५ वर्षांच्या दोन मुली आहेत. सोमवारी (दि. ८ डिसेंबर) रात्री रात्री रत्ना आणि सूर्यामध्ये भांडण झाले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास रत्नाने घरात ठेवलेल्या चाकूने सूर्य प्रतापचा गळा चिरला. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी रत्नाच्या दोन्ही मुलीही घरात उपस्थित होत्या.सकाळी तिने फोनवरून पोलिसांना हत्येची माहिती दिली. पोलिसांनी तिला अटक केली. तरुणाच्या वडिलांनी त्याच्या प्रेयसी आणि तिच्या दोन्ही मुलींविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सूर्य प्रतापची हत्या केल्यानंतर रत्ना आणि तिच्या दोन्ही मुली साडेपाच तास घरातच राहिल्या. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कोणालाही काही सांगितले नाही. सकाळी ९:४५ वाजता, रत्नाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून हत्येची तक्रार केली.
सूर्य प्रतापच्या वडिलांनी सांगितले की त्यांना त्यांच्या मुलाचे लग्न करायचे होते आणि ते अनेक लोकांशी चर्चा करत होते. रविवारी संध्याकाळी त्यांनी त्यांच्या मुलाशी शेवटचे फोनवर बोलले. त्यावेळी सर्व काही ठीक होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना फोन करून कळवले की त्यांच्या मुलाची हत्या झाली आहे. पोलीस या प्रकरणी विविध पैलूंचा तपास करत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
सूर्य प्रतापच्या कुटुंबात त्याचे वडील नरेंद्र, आई उषा आणि तीन बहिणी आहेत. त्या सर्व विवाहित आहेत. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या हत्येची बातमी मिळताच उषा या बेशुद्ध पडल्या. मुलाला वर म्हणून पाहण्याची इच्छा होती आता त्याचे अंत्यसंस्कार पाहावे लागतील, असा त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा ठरला.