

Crime News
नागपूर : आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि लग्नाच्या नावाखाली झालेल्या घोर फसवणुकीमुळे एका महिला कबड्डीपटूने कीटकनाशक औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
किरण सूरज दाढे असे मृत खेळाडूचे नाव आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी पती स्वप्निल जयदेव लांबघरे फरार आहे. स्वप्निल याने किरणला वेकोलीत नोकरी लावून देण्याचे अश्वासन दिले होते. या आश्वासनावर २०२० मध्ये किरणने नोंदणी पद्धतीने त्याच्याशी लग्न केले, पण त्यानंतर त्याने या विषयी टाळाटाळ केली. तो शारिरीक संबंधासाठी बळजबरी करत असल्याने तसेच मानसिक त्रास देऊ लागल्याने किरण माहेरी राहत होती.
नोकरी लावून देणे दूरच उलट धमक्या, शिवीगाळ, यामुळे वैतागलेल्या किरणने कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. सर्व त्रासाला वैतागून तिने ४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कीटकनाशक प्राशन केले होते. उपचारा दरम्यान नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी (दि. ७) किरणचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे.