

BJP MP Bhojraj Nag
रायपूर: “हवामान खराब होते, मुसळधार पाऊस पडत होता. मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असल्याची माहिती मला मिळाली, तेव्हा मी महादेवाला प्रार्थना केली आणि एक लिंबू कापून पाऊस थांबवला,” असा विचित्र दावा छत्तीसगडमधील कांकेरचे भाजप खासदार भोजराज नाग यांनी केला आहे.
मंगळवारी दौंडीलोहारा येथे आयोजित एका जाहीर सभेत नाग यांनी हे विधान केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री विष्णू देव साय उपस्थित होते. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, काँग्रेसने त्यांची खिल्ली उडवली आहे, तर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी यावर टीका केली आहे. याआधीही सार्वजनिक भाषणांमध्ये लिंबू कापणे आणि भूत काढणे यांसारख्या विधानांमुळे ते चर्चेत राहिले आहेत.
खासदार नाग म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सूचना मध्यरात्रीच्या सुमारास मिळाली. मात्र आदल्या दिवशीही हवामान खराब होते. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मी बुढादेव आणि महादेवाला साकडे घातले आणि लिंबू कापून पाऊस थांबवला. आता कार्यक्रम यशस्वी झाला आहे, आता पाऊस पडायचा असेल तर पडू दे.” त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री साय यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थितांमध्ये हशा पिकला.
छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी नाग यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. खासदार समाजात अंधश्रद्धा आणि भ्रम पसरवत असल्याचा आरोप करत बैज म्हणाले, “जर लिंबू कापल्याने पाऊस थांबत असेल, तर त्यांनी एक लिंबू कापून देशातील महागाई आणि साखरेचे भावही कमी करून दाखवावेत.”