Amazon investment in India : अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी 'अॅमेझॉन'चे (Amazon) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जॅसी यांनी आज (दि. २५) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी अॅमेझॉनतर्फे भारतात २०२६ ते २०३० या कालावधीत आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एकूण ४८ अब्ज डॉलर्सची (सुमारे ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) गुंतवणूक करण्याची मोठी घोषणा केली.
जॅसी यांनी देशातील AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारासाठी २०३० पर्यंत अतिरिक्त १३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. या नवीन घोषणेमुळे, २०२६ ते २०३० दरम्यान AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी अॅमेझॉनची एकूण नियोजित गुंतवणूक २१ अब्ज डॉलर्सच्या पार जाईल (ही रक्कम एकूण ४८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचाच एक भाग आहे). या गुंतवणुकीमुळे अॅमेझॉन भारतातील AI आणि क्लाउड क्षेत्रातील सर्वात मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांपैकी एक बनणार आहे.
या गुंतवणुकीच्या माध्यमातून मुंबई आणि हैदराबादमधील AWS (Amazon Web Services) डेटा सेंटर्सची क्षमता वाढवली जाईल. यामुळे भारतातील स्टार्टअप्स, मोठे उद्योग आणि सरकारी संस्थांना सानुकूलित (custom) AI चिप्स, व्यवस्थापित AI सेवा, सुरक्षित-विश्वासार्ह क्लाउड तंत्रज्ञान आणि डेव्हलपर टूल्स उपलब्ध होतील. परिणामी, त्यांना वेगाने नवनवीन शोध लावणे, व्यवसायाचा विस्तार करणे आणि जागतिक स्तरावर ग्राहकांना सेवा देणे सोपे होईल. तसेच २०१० ते २०३० या काळात अॅमेझॉनची भारतातील एकूण एकत्रित (cumulative) गुंतवणूक ८८ अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे.
अँडी जॅसी म्हणाले, "गेल्या १२ वर्षांतील पंतप्रधानांची दूरदृष्टी खरोखरच उल्लेखनीय आहे. देशाच्या विकासात आणि जगातील प्रत्येक क्षेत्रात भारताचे महत्त्व कसे वाढत आहे, यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. २०१० पासून तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या अॅमेझॉन कंपनीने भारतात ४० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, तर गेल्या वर्षी आणखी ३५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती. आम्ही आजच ही घोषणा केली आहे की, २०२६ ते २०३० दरम्यान आम्ही ही रक्कम ३५ अब्ज डॉलर्सवरून वाढवून अतिरिक्त ४८ अब्ज डॉलर्स करत आहोत," असे जॅसी यांनी सांगितले.
"आम्ही एका दशकापूर्वी भारतात आलो आणि तेव्हापासून आमच्या विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्राहक, विक्रेते, डेव्हलपर्स, स्टार्टअप्स आणि उद्योगांना सेवा देत आहोत. याला भारतातून मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे, विशेषतः आमच्या ई-कॉमर्स, AI आणि क्लाउड व्यवसायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतातील व्यवसायाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशाच्या प्राधान्यक्रमांना हातभार लावण्यासाठी आम्ही आगामी पाच वर्षांत ४८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहोत. पंतप्रधान मोदींच्या 'विकसित आणि आत्मनिर्भर भारता'च्या संकल्पनेने आम्ही प्रेरित झालो असून, भारताच्या या विकास प्रवासात दीर्घकालीन भागीदार राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत," अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
"भारत जागतिक स्तरावर क्लाउड आणि AI चे एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. येथे इतकी मोठी मागणी आहे की आम्ही क्लाउड आणि AI क्षेत्रात सातत्याने गुंतवणूक करत आहोत," असे सांगत जॅसी यांनी स्पष्ट केले की, या गुंतवणुकीमुळे देशात दीर्घकालीन रोजगार आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अॅमेझॉनची अतिरिक्त १३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगातील वाढती उत्सुकता दर्शवते. अँडी जॅसी यांच्यासोबत अत्यंत सकारात्मक बैठक झाली. अॅमेझॉनने भारतात केलेल्या विक्रमी ४८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे मी स्वागत करतो. यामुळे आपल्या तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील. तसेच, हे भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील वाढत्या आकर्षणाचे प्रतीक आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.