

नीस (फ्रान्स); वृत्तसंस्था : भारत हा नवोपक्रमांचा देश असून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदल यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात भक्कम भागीदारी आहे, असे प्रतिपादन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी केले. फ्रान्समधील नीस शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत इनोव्हेटस् २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले, आम्ही भारताच्या ‘मेक इन-इंडिया’ उपक्रमाचा आदर करतो. फ्रान्स विविध क्षेत्रांत या मोहिमेचा एक अविभाज्य भाग राहिला आहे.
फ्रान्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा पार पडली. या बैठकीत पश्चिम आशियातील परिस्थिती आणि युक्रेनमधील सद्यस्थितीसह जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत फ्रेंच विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्याचे आमंत्रणही दिले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि फ्रान्सच्या संबंधांना 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी'चा दर्जा दिल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.
संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवणार
संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सर्व स्तरांवर होत असलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संरक्षण सामग्री आणि प्रगत तंत्रज्ञानाची संयुक्त रचना, विकास आणि उत्पादनाला चालना देऊन हे सहकार्य अधिक बळकट करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली. 'ह्यूमन स्पेसफ्लाइट' आणि 'स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस' या अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही चर्चा झाली. याशिवाय, अंतराळ क्षेत्रात खाजगी कंपन्यांमधील भागीदारी वाढवण्याच्या मार्गांवरही विचारमंथन करण्यात आले. नागरी अणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही नेत्यांनी नमूद केले की, भारताचा 'शांती' कायदा सहकार्याच्या नवीन संधी निर्माण करतो, ज्यामध्ये लहान आणि प्रगत मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या भागीदारीचाही समावेश आहे.
व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य
भारत आणि फ्रान्समध्ये सातत्याने वाढत असलेल्या द्विपक्षीय व्यापारावर समाधान व्यक्त करत, येत्या पाच वर्षांत तो दुप्पट करण्यासाठी एक उच्च-स्तरीय यंत्रणा स्थापन करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करार लवकरात लवकर लागू करण्याचे आवाहन केले.