
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर आहेत. इटलीची राजधानी रोममध्ये अत्यंत दिमाखात त्यांचे स्वागत करण्यात आले. मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमध्ये आधी ‘डिनर डिप्लोमसी’ रंगली आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांनी रोममधील ऐतिहासिक आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या 'कोलोसियम' स्मारकाला भेट दिली. सोशल मीडियावर या दोन्ही नेत्यांच्या 'Melodi' केमिस्ट्रीची आणि भेटीच्या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान मोदींनी या भेटीचे फोटो 'एक्स' वर शेअर करत लिहिले आहे की, "रोममध्ये उतरल्यानंतर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत रात्रीच्या भोजनासोबत चर्चा करण्याची आणि त्यानंतर ऐतिहासिक कोलोसियमला भेट देण्याची संधी मिळाली.
दुसरीकडे, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही मोदींचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर करत त्यांनी "रोममध्ये स्वागत आहे, माझ्या मित्रा!" अशी पोस्ट लिहिली.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रात्री प्रकाशात उजळून निघालेल्या कोलोसियमच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि मेलॉनी गप्पा मारताना दिसत आहेत.
यावेळी पंतप्रधान मोदींनी गडद निळ्या रंगाचा जोधपुरी सूट परिधान केला होता, तर जॉर्जिया मेलॉनी यांनी हलक्या गुलाबी रंगाचा एम्ब्रॉयडरी असलेला टॉप आणि पांढरी ट्राउझर परिधान केली होती. एका फोटोत दोघेही सूर्यास्ताच्या वेळी रोमच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेत चर्चा करताना दिसत आहेत.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी इटलीचे प्रसिद्ध चित्रकार गियामपाओलो तोमासेटी यांच्या कलाकृतींचे विशेष कौतुक केले. तोमासेटी भारतीय संस्कृतीशी जोडलेले असून, त्यांनी वाराणसी आणि भारतीय अध्यात्मावर आधारित अनेक अप्रतिम चित्रे रेखाटली आहेत.
रोममध्ये पोहोचताच भारतीय समुदायाकडून पंतप्रधान मोदींचे ढोल-ताशांच्या गजरात आणि तिरंगा फडकवत जंगी स्वागत केले. हॉटेलबाहेर जमलेल्या लहान मुलांशी मोदींनी संवाद साधला आणि एका लहान चाहत्याने रेखाटलेल्या चित्रावर स्वाक्षरी देखील दिली. "भारतीय समुदायाने केलेल्या या स्वागतामुळे मी भारावून गेलो आहे. परदेशात राहूनही त्यांची भारतावरील निष्ठा अभिमानास्पद आहे," अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींचा हा रोम दौरा भारत-इटली यांच्यातील 'संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा २०२५-२०२९'च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अंतर्गत व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांत दोन्ही देश सहकार्य वाढवणार आहेत.