

सुहेल सेठ
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यांनी एक असा मार्ग निवडला, जो फारसा वापरात आणला गेला आणि कदाचित हाच सर्वात मोठा फरक ठरला. पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी या दोन व्यक्तिमत्त्वांत माध्यमातून देशाच्या पंतप्रधानपदाच्या नेतृत्वाचे दोन परस्पर भिन्न कालखंड एकमेकांशी जोडले गेले आहेत. यातल्या प्रत्येक युगाची व्याख्या ही त्याच्या स्वतःच्या मर्यादा, निवडलेले पर्याय आणि महत्त्वाकांक्षेवर आधारलेली आहे. नेहरू यांनी एका नाजूक, नव्याने सार्वभौम झालेल्या देशाचे नेतृत्व केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आघातांचा सामना करत असलेल्या एका विशाल, डिजिटल व्यवस्था असलेल्या, अत्यंत स्पर्धात्मक लोकशाहीचे नेतृत्व करत आहेत. राज्यांची क्षमता, सर्वसमावेशकता, पायाभूत सुविधा, मुत्सद्देगिरी आणि सेवा वितरण या सर्वच बाबतीत नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ अधिक प्रभावशाली ठरला आहे.
पं. नेहरू यांचे प्रशासकीय तत्त्वज्ञान हे वरपासून खालपर्यंत झिरपणाऱ्या उतरंडीनुसारची संस्थात्मक उभारणी आणि शासनावर आधारित अर्थव्यवस्थेवर केंद्रीत होते. खरे तर, ही रचना फाळणीनंतर स्वतःला सावरत असलेल्या देशासाठी योग्य होती; पण यामुळे नागरिकांना प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेण्याऐवजी बऱ्याचदा केवळ लाभ घेणारे घटक एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवणारी अशा स्वरूपाचे केंद्रीय नियंत्रण असलेल्या व्यवस्थेचा पाया रचला गेला. दुसरीकडे मोदी यांच्या दृष्टिकोनातील प्रशासन म्हणजे सन्मान आणि सेवा वितरणाच्या आधारे चालणारी एक लोकचळवळच आहे. ही खालपासून वरपर्यंतच्या अशा स्वरूपाची संरचना आहे. म्हणूनच त्यात बँक खाती, थेट लाभ हस्तांतरण, किफायतशीर दरातील गॅस कनेक्शन, घरे, शौचालये, जलद गतीने रस्ते बांधणी आणि डिजिटलायझेशन केलेले लोककल्याणकारी उपक्रम असे अनेक घटक दिसतात.
नेहरू यांनी पदभार स्वीकारला तेव्हा भारताची लोकसंख्या ३४ कोटींच्या आसपास होती. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा लोकसंख्या १३१ कोटींवर होती. पहिल्या निवडणुकीत अंदाजे १७ कोटी मतदार होते, तर २०१४ मध्ये ८३ कोटींहून अधिक. मोदींना सातत्याने मिळालेले राष्ट्रीय जनादेश हे अशा विखंडीत राजकीय व्यवस्थेच्या तसेच २४x७ डिजिटल देखरेखीच्या छायेत असण्याच्या अत्यंत आव्हानात्मक काळात मिळाले. मोदी सलग तीन लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिले. अनेक कुटुंबांमधील तीन पिढ्यांसाठी तितकेच प्रासंगिक राहिले.
आर्थिक आघाडीवर विचार केला, तर नेहरूंच्या मॉडेलने पायाभूत औद्योगिक आणि वैज्ञानिक संस्थांच्या जडणघडणीला पाठबळ आणि वेग निश्चितच दिला; मात्र त्यानंतर ही आर्थिक प्रगती ३ ते ४ टक्क्यांच्या आसपास रेंगाळत हिंदू विकास दरामध्येच अडकून राहिली. याउलट मोदी यांच्या नेतृत्वात भारत आज जागतिक विकासाचे एक प्रमुख इंजिन म्हणून काम करतो आहे. कोव्हिड, महागाई, पुरवठा साखळीतील अडथळे आणि भूराजकीय संघर्षांनी ग्रासलेल्या या दशकात देशाचा सरासरी विकास दर सुमारे ६.५ ते ७ टक्के राहिला. २०१४ ते २०२४ दरम्यान राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ५४ हजार किलोमीटरपेक्षा जास्तीने विस्तारले. पायाभूत सुविधांचा हा व्यापक विस्तार तसेच, यूपीआय पेमेंटची सुविधा, आधार आधारित सेवा वितरण आणि लोककल्याणकारी योजनांचा कुठूनही घेता येणारा लाभ अशा डिजिटल व्यवस्थेच्या एकात्मीकरणामुळे धोरणात्मक घोषणा आणि नागरिकांवर होणारा त्याचा प्रत्यक्ष प्रभाव यामधील वेळेच्या अंतरात कमालीची घट झाली.
नेहरू यांनी आयआयटी, एम्स यांसारखे महत्त्वाचे स्तंभ उभारले. मोदी काळात या संस्थाच्या व्यापक विस्तारावर भर दिला गेला. त्यामुळेच आयआयटीची संख्या वाढून २३, आयआयएमची २१, तर एम्सची संख्या वाढून २३ झाली. मोदी यांच्या मंत्रिमंडळात इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधित्वाला अनन्यसाधारण पातळीवर प्राधान्य दिले गेले. महिलांचे प्रतिनिधित्व १९५० च्या दशकातील एकअंकी टक्केवारीवरून पुढे जात नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे एक तृतीयांश आरक्षणापर्यंत पोहोचले. परराष्ट्र धोरणातही फरक ठळकपणे दिसतो. नेहरू यांचे अलिप्ततावादी धोरण हे तत्त्वांवर आधारित होते; परंतु ध्रुवीकरण झालेल्या जगात ते देशाला एकाकी पाडणारे ठरत होते. याउलट मोदी यांचे बहुआयामी धोरण हे व्यावहारिक, बहुस्तरीय आणि उघडपणे देशाच्या हितसंबंधांवर आधारलेले आहे. म्हणूनच आज अमेरिका, रशिया, युरोप, आखाती देश आणि ग्लोबल साऊथअंतर्गत येणाऱ्या देशांसोबत एकाच वेळी संवाद साधला जाऊ लागला असून, भारताची बाजारपेठ, तंत्रज्ञानाची मागणी आणि अनिवासी भारतीयांचा प्रभाव या घटकांना वाटाघाटीच्या ताकदीमध्ये परावर्तीत केले जात आहे.
नेहरू यांचा कार्यकाळ भारत-पाकिस्तानमधल्या पहिल्या युद्धापासून ते १९६२ मधील चीनसोबतच्या युद्धापर्यंत अनेक संघर्षांनी व्यापलेला आहे, तर नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ हा शेजारी देश अस्थिर असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत पूर्ण व्याप्तीचे पारंपरिक युद्ध टाळत देशाच्या प्रतिबंधात्मक क्षमतांना मोजक्या पण चोख प्रतिसादांशी आणि सक्रिय स्वरूपातील सीमा व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. मोदींनी इंदिरा गांधी यांचा कार्यकाळही मागे टाकला. ते नेहरूंच्या अविरत सेवेच्या मानकाच्याही अगदी जवळ पोहोचले आहेत. राज्य तसेच राष्ट्रीय दोन्ही पातळ्यांवरील लोकप्रतिनिधी या नात्याने देशातील सर्वात मोठा एकत्रित कार्यकाळ त्यांनी आधीच पूर्ण केला आहे.
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या नेतृत्वाची आवश्यकता असते. पहिल्या युगाने विकासाचा पाया रचला, तर दुसऱ्या युगाने त्या पायाला बळकटी देत त्याची रचना अधिक सुदृढ केली, विकासाच्या वाटा विस्तारल्या, व्यवस्थेला डिजिटल स्वरूप दिले आणि जगासाठी प्रगतीचा नवा मार्ग उजळून टाकला. सर्वसमावेशकता, सेवा वितरण, पायाभूत सुविधा आणि जागतिक प्रभाव या सर्वच निकषांवर विचार करता मोदी हे अधिक प्रभावशाली पंतप्रधान आणि जागतिक पटलावरील खंबीर नेते ठरले आहेत. म्हणूनच मोदी यांच्या नेतृत्वाचे हे युग ते हे पद जेव्हा केव्हा सोडतील त्यानंतरही दीर्घकाळ छाप सोडणारे असेल. कोट्यवधी भारतीयांसाठी नरेंद्र मोदी हे भारताला आवश्यक असलेली प्रेरणादायी आणि परिवर्तनाला चालना देणारी शक्ती ठरले आहेत.
(लेखक उद्योजक आणि स्तंंभलेखक आहेत.)