Ahmedabad Plane Crash : ‘इंधन स्विच’मधील दोषच कारणीभूत, 'एअर इंडिया' अपघातातील मृतांच्या कुटुंबियांनी ‘बोईंग'ला कोर्टात खेचलं

Air India Flight Crash : उड्डाणानंतर केवळ ३२ सेकंदांतच विमान एका इमारतीवर आदळले.
ahmedabad plane crash air india flight
Published on
Updated on

ahmedabad plane crash air india flight

अहमदाबादमध्ये या वर्षी जून महिन्यात झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४ प्रवाशांच्या नातेवाईकांनी अमेरिकेत खटला दाखल केला आहे. या खटल्यात त्यांनी विमान उत्पादक कंपनी बोईंग आणि सुटे भाग बनवणाऱ्या हनीवेल कंपनीवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बोईंग ७८७ हे विमान कोसळले. या दुर्घटनेत २२९ प्रवासी, १२ विमान कर्मचारी यांसह १९ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. तर केवळ एक प्रवासी बचावला.

मंगळवारी (दि. १६) डेलावेअरमधील वरिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेल्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाच्या इंधन स्विचच्या सदोष डिझाइनमुळे उड्डाणानंतर काही सेकंदातच हा अपघात घडला, असा दावा करण्यात आला आहे.

ahmedabad plane crash air india flight
Ahmedabad Plane Crash |आगीत मुलासाठी ती बनली ढाल, जीवदान देण्यासाठी आईची ‘खाल’

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या अपघातात बळी पडलेल्या कांताबेन धिरुभाई पाघदळ, नाव्या चिराग पाघदळ, कुबेरभाई पटेल आणि बाबीबेन पटेल यांच्या कुटुंबियांच्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला असून, त्यात अद्याप भरपाईची रक्कम नमूद केलेली नाही.

ahmedabad plane crash air india flight
Air India Plane Crash Report : विमानाने उड्डाण केले आणि कोसळले...जाणून घ्‍या अपघात होण्‍यापूर्वी प्रत्‍येक सेकंदाला काय घडलं?

खटल्यातील आरोप

मृतांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, सदोष इंधन स्विचमुळे हा अपघात झाला. खटल्यात असाही आरोप आहे की, बोईंग आणि हनीवेलला या धोक्याची आधीच माहिती होती, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. २०१८ मध्ये अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) विमान चालकांना इंधन स्विचच्या लॉकिंग यंत्रणेची तपासणी करण्याचा सल्ला दिला होता, परंतु ते अनिवार्य केले नव्हते. कंपन्यांना धोक्याची जाणीव असतानाही त्यांनी यासंदर्भात इशारा देण्यात किंवा सुधारणा करण्यात निष्काळजीपणा दाखवला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विच सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. बोईंगने यावर थेट भाष्य करण्यास नकार दिला असून, भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोच्या (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) प्राथमिक अहवालाचा संदर्भ दिला. अहवालानुसार, हा स्विच चुकून 'रन' वरून 'कट-ऑफ' स्थितीत गेल्यामुळे विमानाचा जोर (थ्रस्ट) कमी झाला. नातेवाईकांनी यास डिझाइनमधील दोष असल्याचे म्हटले असून, कंपन्यांनी सदोष भाग बदलून देण्याची किंवा तपासणी अनिवार्य करण्याची पाऊले उचलली नाहीत, असा आरोप केला आहे.

ahmedabad plane crash air india flight
Ahmedabad Plane Crash: इंधन नियंत्रण स्विच बंद कसे झाले? प्राथमिक चौकशी अहवालात वैमानिकांचा शेवटचा संवाद समोर

प्राथमिक तपासणीत काय आढळले?

भारताच्या विमान अपघात तपासणी ब्युरो (एएआयबी) नुसार, ड्रीमलायनरने सामान्यपणे उड्डाण केले, परंतु त्यानंतर लगेचच दोन्ही इंजिनची पॉवर कट ऑफ झाली.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्याला, “तू इंधन का बंद केलेस?” असा प्रश्न विचारल्याचे ऐकू आले. त्यावर सहवैमानिकाने, “मी बंद केले नाही,” असे उत्तर दिले.

तपासात आढळले की, इंधन स्विच “कटऑफ” स्थितीत होता, ज्यामुळे दोन्ही इंजिनचा वीजपुरवठा खंडित झाला. कर्मचाऱ्यांनी १४ सेकंदांच्या आत तो पुन्हा “रन” स्थितीवर आणला, ज्यामुळे इंजिन पुन्हा सुरू झाले. मात्र, तोपर्यंत विमानाची गती गंभीररीत्या कमी झाली होती.

उड्डाणानंतर केवळ ३२ सेकंदांतच विमान एका इमारतीवर आदळले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाइन (आरएटी), जी इंजिन पूर्णपणे निकामी झाल्यावर वापरली जाणारी बॅकअप वीज प्रणाली आहे, ती कार्यान्वित झाल्याचे आढळून आले. तसेच, एएआयबीच्या अहवालात पक्ष्यांच्या धडकेची शक्यता फेटाळली असून, त्या परिसरात पक्ष्यांच्या हालचालीचा कोणताही पुरावा मिळाला नाही.

हवाई सुरक्षा तज्ज्ञांनी रॉयटर्सला सांगितले की, या स्विचच्या रचनेमुळे चुकून ते सक्रिय होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कायदेशीर विश्लेषकांच्या मते, बहुतेक हवाई अपघात अनेक कारणांमुळे घडतात. मात्र, विमान कंपन्यांवर उत्तरदायित्वाची मर्यादा असल्याने, उत्पादक कंपन्यांवर खटले दाखल करणे सामान्य आहे.

इंधन नियंत्रण स्विच म्हणजे काय?

इंधन नियंत्रण स्विच विमानातील इंजिन्सना इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतात. ते इंजिन सुरू करताना, बंद करताना आणि उड्डाणादरम्यानच्या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असतात. बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरमध्ये हे स्विच थ्रस्ट लीव्हरच्या खाली ठेवलेले असतात. जर ते “कटऑफ” स्थितीवर हलवले, तर ते लगेच इंजिनचा पॉवर खंडित करतात. हवाई अभियंत्यांनी हे स्विच चुकून सक्रिय होणार नाहीत, अशा पद्धतीने ते डिझाइन केलेले असल्याचे सांगितले आहे. मात्र, एकदा हे स्विच फिरवले की, त्याचा परिणाम लगेच होतो आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही, हे एअर इंडियाच्या अपघातातून दुर्दैवाने सिद्ध झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news