

अहमदाबाद; वृत्तसंस्था : 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत 260 लोकांचा बळी घेतला; पण याच विनाशकारी घटनेतून एका आईच्या असीम शौर्याची आणि वात्सल्याची गाथा समोर आली आहे. आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला आगीच्या लोळांपासून वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराची ढाल करणार्या मनीषा कछाडिया आज खर्याअर्थाने ‘नायिका’ ठरल्या आहेत. त्यांनी केवळ अपघातातच नव्हे, तर रुग्णालयातही आपल्या मुलाला जीवदान दिले आहे.
एअर इंडियाचे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी इमारतीवर कोसळले, तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला होता. मनीषा कछाडिया यांच्या घरात क्षणार्धात धूर आणि आगीचे लोळ पसरले. त्या भयंकरक्षणी मनीषा यांनी कसलाही विचार न करता आपला आठ महिन्यांचा मुलगा ध्यांशला घट्ट छातीशी कवटाळले आणि स्वतः त्याच्यासाठी ढाल बनल्या. या घटनेत मनीषा 25 टक्के, तर लहानगा ध्यांश 36 टक्के भाजला.
एका क्षणासाठी डोळ्यासमोर अंधारी आली आणि आमचं घर उष्णतेने भरून गेलं, असं सांगताना मनीषा यांच्या डोळ्यात ती भीती आजही तरळते. मला वाटलं आम्ही वाचणार नाही, पण माझ्या मुलासाठी मला जगायचं होतं, असे त्या म्हणाल्या. पाच आठवड्यांच्या अथक उपचारानंतर, मनीषा आणि ध्यांश या दोघांनाही रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ध्यांशचे वडील डॉ. कपिल कछाडिया यांनीही मुलाच्या सुश्रुषेत महत्त्वाची भूमिका बजावली. अग्नी आणि नियती या दोन्हींवर मात करणार्या या आईच्या प्रेमाची ही कहाणी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
अपघातानंतर दोघांनाही केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ध्यांशची प्रकृती चिंताजनक होती आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या उपचारातील सर्वात महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी क्षण तेव्हा आला, जेव्हा त्याला त्वचारोपण करण्याची गरज होती. यावेळी आई मनीषा पुन्हा एकदा आपल्या मुलासाठी ‘ढाल’ बनली आणि तिने आपल्या त्वचेचे दान केले. तिच्या या त्यागाने डॉक्टर्सही भारावून गेले.