Apple कंपनीचे बाजार मुल्य पाहून थक्क व्हाल! ब्रिटन, फ्रान्स, भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडले भारी! | पुढारी

Apple कंपनीचे बाजार मुल्य पाहून थक्क व्हाल! ब्रिटन, फ्रान्स, भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडले भारी!

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयफोन (iPhone) बनवणारी अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी ॲपलचे (Apple) बाजार मुल्य (मार्केट कॅप) ३ लाख कोटी डॉलरवर ($3 trillion) पोहोचले आहे. अशी कामगिरी ॲपल ही जगातील पहिली कंपनी आहे. कोरोना काळात कंपनीच्या शेअर्समध्ये तीन पटीने तेजी आली. ॲपलचे बाजार मुल्य हे जर्मनीच्या नंतर जगातील एका मोठ्या देशाच्या अर्थव्यवस्थेएवढे आहे. हे मुल्य याआधीच भारताच्या नॉमिनल जीडीपी ((GDP) च्या अधिक झाले आहे.

डिज्नी, नेटफ्लिक्स, वॉलमार्ट, नाइकी, एक्सॉन मोबिल, कोका-कोला, कॉमकास्ट, मॉर्गन स्टेनली, मॅकडॉनल्ड्स, एटीएंडटी, गोल्डमॅन सैक्स, बोइंग, आईबीएम आणि फोर्ड सारख्या दिग्गज कंपन्यांची उलाढाल एकत्र केली तरी त्याहून ॲपलचे (Apple) बाजार मुल्य अधिक आहे. असे ध्येय गाठणारी जगातील ही पहिली पब्लिक ट्रेडेड कंपनी आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ॲपलच्या शेअरची किंमत १८२.८८ डॉलरवर पोहोचली होती. कंपनीच्या शेअर्सने गाठलेला हा उच्चांक आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या बाजाराच्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीचे शेअर्स १७७.५७ डॉलरवर होते. कोरोना काळात कंपनीच्या शेअर्समध्ये तीन पटीने तेजी आली. मार्च २०२० मध्ये कंपनीचा शेअर ५१.७८ डॉलरवर होता. मात्र, जुलै २०२० मध्ये शेअर्सने तिहेरी अंकापर्यंत मजल मारली.

गॅरेजमधून सुरुवात झाली होती कंपनीची सुरुवात…

१९७६ मध्ये कॅलिफोर्नियात एका गॅरेजमध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती. आता या कंपनीची उलाढाल ३ ट्रिलियन डॉलर झाली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये कंपनीचे बाजार मुल्य एक ट्रिलियन डॉलरवर (१ लाख कोटी डॉलर) पोहोचले होते. हा पल्ला गाठण्यासाठी कंपनीला तब्बल ४२ वर्षे लागली. त्यानंतर दोन वर्षानंतर कंपनीचे बाजार मुल्य २ ट्रिलियन डॉलरहून (२ लाख कोटी डॉलर) अधिक झाले. त्यानंतर ३ ट्रिलियन डॉलर (३ लाख कोटी डॉलर) बाजार मुल्य होण्यासाठी कंपनीला केवळ साडेसोळा महिन्याचा कालावधी लागला.

ॲपल कंपनी ही जगातील पाचव्या क्रमांकाची एक अर्थव्यवस्थाच…

अमेरिकेचा नॉमिनल जीडीपी २०.४९ लाख कोटी डॉलर एवढा आहे. तर चीनचा नॉमिनल जीडीपी १३.४ लाख कोटी डॉलर आहे. तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे. जपानचा नॉमिनल जीडीपी ४.९७ लाख कोटी डॉलर आहे. चौथ्या क्रमांकावर जर्मनी (४ लाख कोटी डॉलर) आहे. ब्रिटन पाचव्या (२.८३ लाख कोटी डॉलर) तर फ्रान्स (२.७८ लाख कोटी डॉलर) सहाव्या आणि भारत (२.७२ लाख कोटी डॉलर) जगात सातव्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ ॲपलचे बाजार मुल्य हे जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसारखे आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

Back to top button