महत्वाची बातमी! १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी १ जानेवारीपासून CoWIN वर नोंदणी | पुढारी

महत्वाची बातमी! १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी १ जानेवारीपासून CoWIN वर नोंदणी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोना महामारीच्या लढाईचा पुढचा टप्पा म्हणून येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शनिवारी केली होती. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन डोस (बूस्टर) देण्याची मोहीम १० जानेवारीपासून सुरू करण्यात येईल, तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस देण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले होते. दरम्यान, लसीकरणासाठी १५ ते १८ वयोगटातील मुले १ जानेवारीपासून CoWIN अॅपवर नोंदणी करू शकतील, अशी माहिती CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी दिली आहे.

”आधार अथवा इतर ओळखपत्रे उपलब्ध नसल्यास पोर्टल किंवा अॅपवर नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी ओळखपत्राचा (student identity cards) वापर करु शकतात. काही जणांकडे आधार कार्ड अथवा इतर ओळखपत्रे नसतील. यामुळे नोंदणीसाठी अतिरिक्त (10 वे) ओळखपत्र म्हणून विद्यार्थी ओळखपत्राचा समावेश केला आहे, असे डॉ. शर्मा यांनी म्हटले आहे.

गेल्या शनिवारी देशाला संबोधित केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नववर्षाचे स्वागत सर्व ती काळजी घेऊन करण्याचे आवाहन केले होते. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाविरोधात भारताने यशस्वी कामगिरी केली आहे, याचा अभिमान वाटतो. आता आपल्याला आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पाडायचा आहे. मुलांचे लसीकरण आणि डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस हा तो टप्पा असेल. तोही यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आम्ही लसीकरणासंदर्भातील निर्णय घेतले आहेत. सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग सुरू आहे. अनेक देशांत त्याचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. भारतातील शास्त्रज्ञही यावर बारीक नजर ठेवून आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला शनिवारी ११ महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये शास्त्रज्ञांनी संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला आहे. त्यानंतरच काही निर्णय घेण्यात आले.

हे ही वाचा :

Back to top button