पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ख्रिसमस निमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांसह देशातील नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावापासून सावध राहून स्वत:सह कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांनी यावेळी महत्त्वाच्या घोषणा करत ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

ओमायक्रॉनचा देशातील संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. परंतु याबाबत घाबरून न जाता अधिक सतर्क राहून नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास पुढील वर्षातील ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस

जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुपाने कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अनेक देशात ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. काही देशांनी पुन्हा लॉकडाऊनचा अवलंब केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने देखील सर्व राज्यांना खबरदारीचे उपाय त्वरीत लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने लागू केला आहे. ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव लक्षात घेता १० जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस दिला जाऊ शकतो, अशी माहिती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याच्या घोषणे बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. १० जानेवारी पासून ६० वर्षांवरील नागरिकांना देखिल बूस्टर डोस दिला जाऊ शकतो परंतु यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांचे सल्ला महत्त्वाचा असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

भारताने शोधली जगातली पहिली डीएनए लस

कोरोनाच्या लढाईमध्ये लसीकरण हे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. देशामध्ये १४१ कोटी लस दिले गेल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. तसेच भारताने जगातली पहिली डीएनए लस शोधल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय लवकर नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस येणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली.

 

Back to top button