Omicron : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्रासह १० राज्यांत पाठविणार तज्ज्ञांची पथके | पुढारी

Omicron : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्रासह १० राज्यांत पाठविणार तज्ज्ञांची पथके

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील ओमायक्रॉन (Omicron) रुग्णसंख्या ४१५ वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्रातील सर्वांधिक म्हणजे १०८ रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ दिल्लीत आतापर्यंत ७९, गुजरात ४३, तेलंगणा ३८, केरळ ३७ आणि तामिळनाडूत ३४ रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन रुग्णसंख्या वाढत असलेल्या तसेच लसीकरणाचा वेग कमी असलेल्या १० राज्यांत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची पथके (multi-disciplinary Central teams) पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही पथके महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांत पाठविली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी रात्री ११ ते सकाळी ५ वाजपर्यंत नाइट कर्फ्यू असणार आहे. दिल्ली, कर्नाटक, ओडिशामध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध घालण्यात आले आहेत. चंदीगढमध्ये लसीचे दोन डोस न घेतलेल्या लोकांना १ जानेवारीपासून सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

११५ ओमायक्रॉन बाधित रुग्ण झाले बरे…

दरम्यान, देशातील ४१५ ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांपैकी ११५ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, ओमायक्रॉन बाधित केवळ ‘पॅरासिटेमॉल’ने बरे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या ओमायक्रॉनबाधितांना पॅरासिटेमॉल आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवणार्‍या गोळ्या दिल्या जात आहेत आणि केवळ एवढ्या उपचाराने हे रुग्ण बरेही होत आहेत, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीतील या सर्वात मोठ्या रुग्णालयात आतापर्यंत दाखल ४० ओमायक्रॉनबाधितांपैकी १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

Back to top button