ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने ‘या’ राज्यात कडक निर्बंध | पुढारी

ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने ‘या’ राज्यात कडक निर्बंध

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला असून अनेक राज्यांत धास्ती वाढली असून दिल्लीत सरकारने नाताळ सेलिब्रेशन आणि न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर कडक निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशात आणखीही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिल्लीत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केले आहे व आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल, अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे.

दिल्लीत ख्रिसमसला मोठी गर्दी होते. अनेक ठिकाणी पार्ट्या होतात. मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होत असते. त्यापाठोपाठ न्यू ईयर पार्ट्यासाठी क्लब आणि मोठ्या हॉटेल्समध्ये जंगी पार्ट्या होतात. विजयपथ आणि अन्य ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. या सर्व बाबी लक्षात घेत संसर्गाचा फैलाव रोखण्यासठी दिल्ली सरकारने कठोर पावले उचलली आहेत. दिल्ली सरकारने काढलेल्या आदेशानुसार दिल्लीत सर्व सामाजिक, राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

दिल्लीत कडक निर्बंध : ‘नो मास्क, नो एंट्री बंधनकारक

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन, गर्दी होईल असा कार्यक्रम आयोजित करण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तांनी कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय दुकाने व आस्थापनांनांही सूचना देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी ‘नो मास्क, नो एंट्री’ हा नियम बंधनकारक करण्यात यावा, असे डीडीएमएने मार्केट ट्रेड असोसिएशनला बजावले आहे.

दिल्लीत ५७ तर देशात २१७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दिल्लीतील करोना बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत करोनाचे आणखी १२५ रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत निर्बंध लावले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button