पुणे : दुचाकीवरील महिलेवर बिबट्याचा हल्ला; जुन्नर तालुक्यातील घटना

Hausabai Shinde
Hausabai Shinde

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक शिवारात दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हौसाबाई दत्तात्रय शिंदे (रा. शिंदेमळा बोरी बुद्रुक) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे हे दुचाकीवरून बोरी गावठाणातून रस्त्याने त्यांच्या शिंदेमळा येथील राहत्या घरी जात होते. सिद्धेश्वर मंदिराजवळ उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप मारली. या हल्ल्यात हौसाबाई शिंदे यांच्या डाव्या पायाला कडाडून चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

वन कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आळे वनपरिमंडलचे वनपाल संतोष साळुंखे, वनरक्षक त्र्यंबक जगताप व ग्रामस्थ घटनास्थळी आले. जखमी हौसाबाई शिंदे यांना उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु, लस उपलब्ध न झाल्याने त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या परिसरात उसाचे योग्य क्षेत्र व पाण्याची उपलब्धता तसेच खाद्यास मिळणारे पाळीव प्राणी यामुळे गेली, कित्येक वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. मंगळवारी सायंकाळी दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news