पुणे : सिंहगड रस्त्यावरील भूगर्भपरीक्षण अखेर सुरू; उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग चौकाजवळ सुरू करण्यात आलेले मातीपरीक्षणाचे काम.
सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग चौकाजवळ सुरू करण्यात आलेले मातीपरीक्षणाचे काम.

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गेले तीन महिने रखडलेले सिंहगड रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलासाठीचे भूगर्भ (माती) परीक्षण बुधवारी अखेर सुरू झाले. त्यामुळे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनानंतर तीन महिन्यांनी काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नर्‍हे, खडकवासला या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून शहरात ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पुलापासून फनटाइम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन केले आहे. या उड्डाणपुलाच्या 118 कोटी 37 लाख 931 रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

दुहेरी उड्डाणपूल खर्चीक असल्याचा अहवाल

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लगेच काम सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, भूमिपूजन कार्यक्रमातच गडकरी यांनी दुमजली उड्डाणपूल करण्याबाबत विचार करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने दुहेरी उड्डाणपूल शक्य नसल्याचा व तो खर्चीक असल्याचा अहवाल सादर केला.

नियोजनानुसार ठेकेदाराने लोखंडी पत्र्याचे बॅरिकेड उभे करून पिलर्स उभे राहणार्‍या ठिकाणाच्या जमिनीचे परीक्षण करण्याचे काम सुरू केले होते. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांनी काम बंद करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून काम सुरू करण्यास वाहतूक पोलिसांकडून परवानगी मागितली जात होती. मात्र, जोपर्यंत या रस्त्याला पर्यायी असलेला कालव्यालगतचा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत कामास परवानगी न देण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला होता.

काम बंद ठेवणे परवडणारे नव्हते

कालव्यालगतचा रस्ता पूर्ण होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा रस्ता पूर्ण होईपर्यंत काम बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांना पर्यायी व्यवस्थेचे सादरीकरण दिले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी काम सुरू करण्यास परवानगी दिल्याने बुधवारपासून मातीपरीक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.

कामासंदर्भात विभागप्रमुखच अनभिज्ञ

नियोजित उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आधी पर्यायी रस्ता, मग कामास परवानगी, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली होती. यामुळे भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. असे असताना महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व घडामोडींबाबत त्यांना विचारणा केल्यानंतर आपणास काहीच माहिती नसल्याचे बोनाला यांनी सांगितले.

''फनटाइम थिएटर ते इनामदार चौकापर्यंत कालव्याशेजारचा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. इनामदार चौक ते राजाराम चौक यादरम्यानच्या रस्त्याची रुंदी मोठी आहे. या रस्त्यावरील सायकल ट्रॅक काढल्यानंतर वाहतुकीला पुरेशी जागा राहणार आहे. ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी काम करण्यास परवानगी दिली. उड्डाणपुलाच्या 72 पिलर्सच्या ठिकाणांच्या मातीपरीक्षणास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.''

                                                                                               – अजय वायसे, उपअभियंते, प्रकल्प विभाग, महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news