राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलाचे लग्न; ५० हून अधिक विमाने | पुढारी

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलाचे लग्न; ५० हून अधिक विमाने

जयपूर, पुढारी ऑनलाईन : सध्या राज्यातील मंत्र्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू असून आता राष्ट्रवादीतील  बड्या नेत्याच्या मुलाचे लग्न चर्चेचा विषय ठरला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची विशेष चर्चा झाली. आता राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नासाठी गुलाबी शहर जयपूर नटलं आहे. या लग्नासाठी जयपूर विमानतळावर एका दिवसात तब्‍बल ५० विमाने उतरली.

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचे शनिवारी जयपूरमध्ये लग्न झाले. त्यानिमित्त जयपूर शहर पाहुण्याच्या स्वागतासाठी नटले होते. या शाही लग्नाला देशभरातील बडे नेते आल्याने जयपूर विमानतळाचे पार्किंग अलिशान गाड्यांनी भरून गेले होते. एका दिवसात जवळपास ५० चार्टर प्लेन जयपूर विमानतळावर उतरले.

जयपूरमध्ये थंडीच्या दिवसांत जयपूरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता मात्र, या लग्नाच्या निमित्ताने व्हीव्हीआयपी पाहुण्यांमुळे शहरातील सगळी हॉटेल्स फुल्ल झाली. विमानतळावर देशातील बडे उद्योजक, अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू आणि राजकीय पुढारी मोठ्या संख्येने दिसत होते.

या लग्नाला स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल, अनिल अंबानी आणि टीना अंबानी, अडानी ग्रुपचे गौतम अडानी, रवी शास्त्री, महेंद्र सिंह धोनी, साक्षी धोनी, हिंदुजा, मित्तल, आदी उद्योजक आपल्या पत्नींसह उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह केंद्रातील अनेक नेते उपस्थित होते.

 महाराष्ट्रातील नेते उपस्थित

महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते या समारंभाला उपस्थित होते. फारूक अब्दुल्ला, कमलनाथ, आनंद शर्मा, राजीव अरोरा यांच्यासह सिनेजगतातील सलमान खान, मधूर भंडारकर, शिल्पा शेट्टीसह अन्य अभिनेते, अभिनेत्री लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सलमान खानच्या नृत्याने बहार आणली.

हेही वाचा : 

Back to top button