ओमायक्रॉन कोरोना साथीचा सर्वांत गंभीर टप्पा; बुस्टर डोस आवश्यकच : बिल गेट्स | पुढारी

ओमायक्रॉन कोरोना साथीचा सर्वांत गंभीर टप्पा; बुस्टर डोस आवश्यकच : बिल गेट्स

पुढारी ऑनलाईन : आपण कोरोनाच्या जागतिक महासाथीच्या सर्वांत धोकादायक टप्प्यात प्रवेश करत आहोत, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हॅरिएंटमुळे जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या संदर्भाने गेट्स यांनी हा इशारा दिला आहे.

बिल गेट्स यांनी ट्वीट करत याबद्दल इशारा दिला आहे. बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, “माझे नियोजित दौरे स्थगित केले आहेत. माझ्या अनेक मित्रांना ओमायक्रॉनची लागण झालेली आहे. जगाने ओमायक्रॉनचे गांभीर्य ओळखले पाहिजे. आपण या जागतिक साथीच्या सर्वांत धोकादायक टप्प्यात प्रवेश करत आहोत, हे सत्य स्वीकारलं पाहिजे.”

ओमायक्रॉनमुळे कोरोनाची लागण पुन्हा होण्याची भीती आणि या व्हॅरिएंटबद्दलची कमी असलेली माहिती हे लक्षात घेत बिल गेट्स यांनी हा इशारा दिलेला आहे.

“ओमायक्रॉनमुळे किती गंभीररीत्या आपण आजारी पडू शकतो, हे आपल्याला अजून माहिती नाही. पण ओमायक्रॉनचा लागण होण्याचा वेग फार मोठा आहे. त्यामुळे डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनमुळे आपण फार आजारी पडत नसलो तरी ते गांभिर्याने घ्यावे लागेल,” असे त्यांनी म्हटलेले आहे.

अमेरिकेत ओमायक्रॉन संसर्गाचा वेग एका आठवड्यात ३ टक्क्यांपासून ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे, हे लक्षात घेत गेट्स यांनी काही उपाययोजनही सुचवल्या आहेत.

मास्क वापरणे, मोठे कार्यक्रम टाळणे आणि बुस्टर डोस घेणे अशा ३ उपाययोजना त्यांनी सांगितलेल्या आहेत. ओमायक्रॉनचा संसर्गाचा वेग मोठा आहे. हे लक्षात घेता ३ महिन्यात तो डॉमिनंन्ट स्ट्रेन बनले. त्यामुळे ही लाट ३ महिने तरी राहील, असे त्यांनी म्हटलेले आहे.

हेही वाचलत का?

Back to top button