ओमायक्रॉनचा ८९ देशांत शिरकाव, दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण : WHO | पुढारी

ओमायक्रॉनचा ८९ देशांत शिरकाव, दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण : WHO

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron variant)  बाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. या व्हेरियंटने ८९ देशांत शिरकाव केला आहे. गंभीर बाब म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे समूह संसर्गाचा धोका असलेल्या देशांत ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण दीड ते तीन दिवसांत दुपटीने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. याआधी डेल्टा व्हेरियंटने भारतासह जगभरात हाहाकार घातला होता. पण कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा आता डेल्टा पेक्षाही वेगाने पसरत आहे. विशेषतः ज्या देशांत समूह संसर्गाचा धोका आहे तिथे नव्या व्हेरियंटचा प्रसार दीड ते तीन दिवसांत दुप्पट वेगाने होत असल्याचे डब्ल्यूएचओने नमूद केले आहे.

ओमायक्रॉन ८९ देशांत पसरलाय. अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २४,९६८ वर गेली आहे. येथे गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत १० हजारने वाढ झाली आहे. तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियातही उद्रेक झाला आहे.

Omicron variant …तर ओमायक्रॉन डेल्टाला मागे टाकेल

“सध्यस्थिती ओमायक्रॉन डेल्टाला मागे टाकेल जेथे समूह संसर्ग होतो,” असे WHO ने म्हटले आहे. ब्रिटनमधील अभ्यासात असे दिसून आले आहे की ओमायक्रॉनपासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा पेक्षा जास्त आहे आणि डेल्टा पेक्षा संसर्ग सौम्य असण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. UN च्या आरोग्य एजन्सीने असे सांगितले आहे की Omicron च्या क्लिनिकल तीव्रतेबद्दल अद्याप मर्यादित डेटा उपलब्ध आहे. पण अधिक डेटा उपलब्ध झाल्यानंतरच ओमायक्रॉनची तीव्रता किती आहे हे समजेल, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

दरम्यान, ज्यांनी लसीचे आवश्यक डोस घेतले आहे. ज्यांना याआधी कोरोना होऊन गेला आहे. अशांना ओमायक्रॉनचा धोका कमी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरियंटने संक्रमित लोकांची संख्या दर ११ दिवसांनी दुप्पट होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. २० मे ते ७ जून दरम्यान घेतलेल्या स्वॅब चाचण्यांच्या विश्लेषणावर आधारावर लंडनच्या इम्पीरियल कॉलेजने याबाबत अभ्यास केला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ :  Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

Back to top button