ओमायक्रॉन : ब्रिटनसारखी स्थिती उद्भवल्यास भारतात दररोज १४ लाख बाधित, नीती आयोगाचा इशारा | पुढारी

ओमायक्रॉन : ब्रिटनसारखी स्थिती उद्भवल्यास भारतात दररोज १४ लाख बाधित, नीती आयोगाचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ब्रिटनमधील ओमायक्रॉन संक्रमणाचे सध्याचे प्रमाण आपण पाहिले आणि भारताच्या लोकसंख्येचा विचार केला, तर आगामी काळात भारतात दररोज 14 लाख नवे रुग्ण आढळण्याची शक्यता आहे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले, की संक्रमणाच्या प्रत्येक प्रकरणाची जिनोम सिक्वेन्सिंग करणेही शक्य होणार नाही.
सध्या जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे; पण प्रत्येक रुग्णाच्या प्रकरणात ते शक्य होणार नाही. मुळात जिनोम सिक्वेन्सिंग ही आजाराच्या निदानाची नव्हे, तर आकलनाची पद्धत आहे.

ब्रिटनमधील स्थिती काय?

ब्रिटनमध्ये शुक्रवारी ओमायक्रॉनचे 3 हजार 201 रुग्ण आढळले. ओमायक्रॉन बाधितांची ब्रिटनमधील संख्या 14 हजार 909 झाली आहे. गेल्या 24 तासांत ब्रिटनमध्ये 93 हजार 45 कोरोना बाधित आढळले आहेत, असे ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेकडून सांगण्यात आले.
अमेरिकन नागरिकांना तत्काळ

लसीकरण करावे : बायडेन

वॉशिंगटन : अमेरिकेत ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इशारा दिला आहे की, थंडीच्या दिवसांत लसीकरण न झालेल्या लोकांना ओमायक्रॉनचा मोठा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी कोरोनाच्या या व्हेरियंटमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशात 7 हजार 145 नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत 7 हजार 145 कोरोनाबाधित आढळले, तर 289 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, 8 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशाचा कोरोनामुक्ती दर 98.38 टक्के नोंदवण्यात आला. भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 3 कोटी 47 लाख 33 हजार 194 पर्यंत पोहोचली आहे. यातील 3 कोटी 41 लाख 71 हजार 471 रुग्ण बरे झाले.

हेही वाचा : 

Back to top button