shivendra raje vs shashikant shinde : भाऊसाहेब महाराजांसाठी ‘त्यांनी’ किती शिफारशी केल्या?; शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंवर पलटवार | पुढारी

shivendra raje vs shashikant shinde : भाऊसाहेब महाराजांसाठी ‘त्यांनी’ किती शिफारशी केल्या?; शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंवर पलटवार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत पाच वर्षासाठी चेअरमन पद द्यावे, अशी भूमिका मी मांडली होती. ही चर्चा आता नको, असे सांगून आ. शशिकांत शिंदेंनी  चेअरमनपदाला विरोध केला होता. त्यांची शिफारस चालत होती तर मंत्रिपदासाठी भाऊसाहेब महाराजांसाठी त्यांनी किती शिफारशी केल्या? पराभव लपवून सहानुभूती मिळवण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत केला. (shivendra raje vs shashikant shinde)

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्हा बँकेची मागील निवडणूक झाली त्यावेळी चेअरमनपद देण्याबाबत राष्ट्रवादी कार्यालयात प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी एका वर्षासाठी चेअरमनपद द्यावे, अशी चर्चा झाली. त्यावेळी पाच वर्षांसाठी चेअरमनपद द्यावे, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी पाच वर्षे चेअरमनदाच्या मागणीला विरोध केला होता. (shivendra raje vs shashikant shinde)

चेअरमनपदाच्या कार्यकाळात जिल्हा बँकेला उंचीवर नेले. राज्यात, देशात जिल्हा बँकेचा नावलौकिक झाला. बँकेची ही घौडदौड कायम रहावी म्हणून पुन्हा चेअरमनपद मिळावे, असा आग्रह होता. पण नितीनकाकांना चेअरमनपद देण्याचा निर्णय झाला. त्यांच्यासाठी मीच सुचक होतो. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गटबाजी आणि राजकारणामुळे आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. या पराभवाचं खापर त्यांनी माझ्यावर फोडू नये, असा टोला त्यांनी लगावला. (shivendra raje vs shashikant shinde)

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कै. अभयसिंहराजे यांना मंत्रिपद दिले नाही. भाऊसाहेब महाराजांना डावलंल त्यावेळी किती शिफारशी केल्या? भाऊसाहेब महाराजांमुळे आमदार झालो असे सांगता पण राष्ट्रवादीतून त्यांच्याविरोधात कुरघोड्या झाल्या त्यावेळी सहकारी आमदार म्हणून तुम्ही किती प्रयत्न केले? असा सवालही आ. शिवेंद्रराजे यांनी केला.

पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगता तर सौरभ शिंदे, प्रविण देशमाने यांचे पराभव का झाले? पं.स. सदस्या अरुणा शिर्के यांच्याविरोधात अपात्रेच्या तक्रारी करणारी माणसं कुणाची होती? गटबाजी करायला जावली का दिसते?  पाटण, माण, खटाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या सीट्स पडल्यात. त्याठिकाणी का पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत नाही? संघर्षासाठी आमची तयारी आहे.त्यांनी यापूर्वीही जावलीत लक्ष घातले होते. आगामी सर्व निवडणुका आम्ही आमच्या ताकदीवर लढणार आहोत. तुम्ही कितीही वातावरण तापवले तरी  तुम्हाला थंड करुन घरी बसवण्याची ताकद आमच्यात आहे, असा जळजळीत इशाराही आ. शिवेंद्रराजेंनी आ. शशिकांत शिंदे यांना दिला.

Back to top button