नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
मी महिलांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. तरीही दिल्ली पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मी दिल्लीतच आहे. माझ्यावर कारवाई करावी, असे आव्हान शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज ( दि. १४ ) दिल्ली पोलिसांना दिले.
राऊत यांची वृत्तवाहिनीवर एक मुलाखत ९ डिसेंबरला प्रसारित झाली होती. या मुलाखतीत राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी अपशब्द वापरले होते. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रर दिली होती . याप्रकरणी सोमवारी ( दि. १३ ) दिल्ली पोलिसांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
महिलांचा अवमान तसेच महिलांसाठी सामाजिकरित्या अपशब्द वापरल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राऊत यांनी केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर कार्यकर्त्यांमध्ये सहभागी असलेल्या महिलांबाबतही चुकीचे शब्द वापरले आहेत. या आधारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राऊत यांच्यासारख्या घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या नेत्याची समाजाबद्दलची जबाबदारी जास्त आहे. मात्र ते बेजबाबदारपणे वागत असल्याची टीका भारद्वाज यांनी केली होती.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी महिलांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. तरीही दिल्ली पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मी दिल्लीतच आहे. माझ्यावर कारवाई करावी. दिल्लीतही शिवसेना आहे, याचाही विचार करावा, असेही ते म्हणाले.
हेही वाचलं का?