Priyank Panchal : प्रियांक पांचाळ कोण आहे; ज्याने रोहित शर्माची जागा घेतली? | पुढारी

Priyank Panchal : प्रियांक पांचाळ कोण आहे; ज्याने रोहित शर्माची जागा घेतली?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, रोहितच्या पायाचे स्नायू ताणले गेले आहेत. गुजरातचा 31 वर्षीय सलामीवीर प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याला रोहितच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. भारत अ संघासोबत प्रियांक सध्या दक्षिण आफ्रिकेतच खेळत आहे.

31 वर्षीय पांचाळ (Priyank Panchal) हा सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांमध्ये फारसा ओळखीचा चेहरा नसला तरी तो स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरात संघाचे नेतृत्व सांभाळतो. मागील काही वर्षांपासून तो भारत ‘अ’ संघाचा नियमित सदस्य आहे. त्याच्याकडे 100 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. तो सध्या भारत ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर आहे आणि तेथे त्याने 96, 24 व 0 अशी तीन डावांत खेळी केली आहे. रणजी करंडक 2016-17 च्या पर्वात पांचाळने 17 डावांत 87.33च्या सरासरीने 1,310 धावा केल्या होत्या.

पांचाळने (Priyank Panchal) पार्थिव पटेलनंतर गुजरातचे नेतृत्व केले. यादरम्यान तो भारत अ संघातही सातत्याने खेळला. 2016-17 च्या रणजी हंगामापासून पांचाळची कारकीर्द चांगली आहे, जिथे त्याने 17 डावात 87.33 च्या सरासरीने 1310 धावा केल्या. त्याची प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ३१४ आहे, जी त्याने त्याच मोसमात पंजाबविरुद्ध केली होती. त्यामुळेच गुजरातला त्यावर्षी पहिले रणजी जेतेपद पटकावण्यातही यश आले होते.

विराटच्या नेतृत्वाखाली खेळाचा आनंद : रोहित (Rohit Sharma)

‘विराट कोहलीने (Virat Kohali) पाच वर्षे संघाचे नेतृत्व केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला,’ असे भारताच्या निर्धारित षटकाच्या मालिकेतील नवीन कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला. कोहलीने टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी रोहितला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले. ‘त्याने पाच वर्ष संघाचे नेतृत्व केले. प्रत्येक सामना जिंकण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरत असे आणि संपूर्ण संघालादेखील त्याने हाच संदेश दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा आम्ही आनंद घेतला. यापुढे आनंद घेत राहीन,’ असे रोहित म्हणाला.

सराव सत्रादरम्यान रोहितला (Rohit Sharma) दुखापत झाली

आफ्रिका दौर्‍यासाठी निवडलेल्या कसोटी संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि सोमवारपासून ते तीन दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत. मात्र, याआधी त्यापैकी काही खेळाडूंनी कसून सराव केला. सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली आणि त्यामुळेच त्याचे आता कसोट मालिकेत खेळणे रद्द झाले आहे. कसोटी मालिकेनंतर कदाचित तो वनडे मालिकेत खेळू शकेल.

रोहितची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का असणार आहे. 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच, नुकतीच त्याची कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून निवड केली गेली आहे. 2019 च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकपासून रोहितचे कसोटीत सलामीला प्रमोशन झाले. त्यानंतर त्याने 16 कसोटीत 58.48 च्या सरासरीने 1,462 धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे.

अधिक वाचा :

Back to top button