माजी सरन्यायाधीश गोगईंविरोधात तृणमूल काँग्रेसने आणला हक्कभंग | पुढारी

माजी सरन्यायाधीश गोगईंविरोधात तृणमूल काँग्रेसने आणला हक्कभंग

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : माजी सरन्यायाधीश गोगईंविरोधात हक्कभंग : राज्यसभेत माझ्या बैठक व्यवस्थेमुळे अस्वस्थ आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तेथे जातो, पक्षाचा व्हीप मला लागू होत नाही, अशी वक्तव्ये करणाऱ्या माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगई यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोसम नूर आणि जवहार सिरकार यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे गोगई चांगलेच अडचणीत आले आहेत. काँग्रेसचे सदस्यही त्यांच्याविरोधाच नोटीस बजावण्याच्या तयारीत आहेत.
एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गोगई म्हणाले, ‘आपल्याला राज्यसभेत जावेसे वाटते तेव्हाच आपण जातो आणि बाहेर पडतो. पक्षांतील सदस्यांना व्हीप जारी होतो त्याप्रमाणे मला लागू होत नाही. राज्यसभेत माझ्यासाठी केलेली बैठक व्यवस्था पाहून मी अस्वस्थ होतो.’

राज्यसभा सदस्य झाल्यानंतर सभागृहातील गोगोई यांची हजेरी १० टक्केच असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर गोगई यांनी नाराजी व्यक्त केली. कोरोना काळातील प्रतिबंधांमुळेही राज्यसभेत जात नव्हतो, असे त्यांनी म्हटले होते.

गोगई हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य असले तरी त्यांची शिफारस भाजपने केली असल्याचे सर्वश्रूत आहे. सरन्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीने खासदारकी स्वीकारल्याने त्यांच्यावर टीकाही केली होती. आयोध्या प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर त्या रात्री सेलिब्रेशन केले होते असे वक्तव्यही केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभेबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

गोगोई यांचे राज्यसभेविषयी केलेले विधान वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा कमी करणारे असल्याचे नमूद करीत मोसम नूर आणि जवाहर सिरकार यांनी त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची नोटीस बजावली.

माजी सरन्यायाधीश गोगईंविरोधात हक्कभंग : रंजन गोगोई यांच्याविरोधात काँग्रेस तसेच राज्यसभेतील विविध पक्षांचे १० सदस्य हक्कभंग प्रस्तावाची नोटीस बजावण्याच्या विचारात आहेत.

हेही वाचा : 

Back to top button