नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : जनरल बिपीन रावत हे देशाचे पहिलेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' आहेत. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी ही जबाबदारी स्वीकारली. लष्कराच्या तिन्ही दलांचे एकाच वेळी संचलन त्यांच्या अखत्यारीत होते.
स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीपासून ते तिन्ही सेना दलांच्या अद्ययावतीकरणासह बिपीन रावत यांच्या खांद्यांवर देशाची मोठी धुरा होती. रावत हे याआधी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते.
पदभार स्वीकारल्यापासून रावत लष्कराच्या 'इंटिग्रेटेड थिएटर कमांड'पासून ते आधुनिकीकरण, अद्ययावतीकरण तसेच स्वदेशी तंत्रज्ञानावर मोठा भर देत आले आहेत. सैन्यदलांतील गैरव्यवहार, प्रकल्पांना होणारा उशीर याबाबत रावत यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
तिन्ही सैन्यदलांत समन्वय
लष्कर, हवाई दल, नौसेना या तिन्ही दलांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग व्हावा आणि तिन्ही सैन्य दलांत समन्वयाचा तसूभरही अभाव राहू नये म्हणून 'इंटिग्रेटेड सिंगल थिएटर प्रोजेक्ट'च्या अनेकविध उपक्रमांवर रावत यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. 'सिंगल थिएटर कमांड'मध्ये ठरलेल्या धोरणानुसारच युद्धाशी निगडित प्रत्येक निर्णय घेतला जाणे, या प्रकल्पात अभिप्रेत आहे. सैन्य दलाच्या देशातील 15 लाख युनिटस्च्या संचलनासाठी तूर्त 4 नव्या थिएटर कमांडच्या रचनेवर काम सुरू आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या 17 कमांडव्यतिरिक्त ही नवी सुविधा असणार आहे.
लष्कराचे आधुनिकीकरण
लष्करातील शस्त्रास्त्रे अद्ययावत करण्यासाठी 'धोरणात्मक भागीदारी' तत्त्वावर सुरू असलेले उपक्रमही रावत यांच्याच देखरेखीखाली आहेत. यानुसार देशातील खासगी कंपन्यांना परदेशी शस्त्रास्त्र उत्पादकांसह संयुक्तपणे लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, पाणबुड्या आणि रणगाडे तयार करण्याची परवानी सरकारतर्फे देण्यात आली होती. 'अॅडव्हान्स सर्व्हिलन्स सिस्टिम'वर (अद्ययावत देखरेख यंत्रणा) रावत यांचा सर्वाधिक भर आहे. लष्कराच्या सायबर क्षमता विकसित करणेही त्यांच्या अजेंड्यावर होते.
सीडीएस रावत यांचा दृष्टिकोन
जवानांच्या गृहनिर्माण प्रकल्पांतील दिरंगाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश रावत यांनी तिन्ही सैन्य दलांना दिले होते.तिन्ही सैन्य दलांकडून संबंधित आस्थापनांविरुद्ध त्यानुसार कारवाईही करण्यात आली होती.
पाकिस्तानच्या तुलनेत चीन हा आपल्या देशासाठी मोठा धोका आहे. पाकिस्तान हा एक दुष्ट देश आहे, पण चीन हा अधिक बलशाली आहे. म्हणून क्षमतांच्या पातळीवर लष्कर म्हणून स्वत:च्या विकास प्रक्रियेत आपण चीनलाच डोळ्यासमोर ठेवणे अधिक योग्य.