Madhulika Rawat : मधुलिका यांनी बिपीन रावत यांना दिली अखेरपर्यंत साथ; जाणून घ्या… | पुढारी

Madhulika Rawat : मधुलिका यांनी बिपीन रावत यांना दिली अखेरपर्यंत साथ; जाणून घ्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांचेही निधन झाले. मधुलिका रावत या मध्य प्रदेशातील शहडोलच्या एका राजघराण्यातील. लष्करातील खडतर प्रवासात त्यांनी जनरल रावत यांची साथ दिली.

हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचा मृत्यू शहडोल येथील सोागपूर येथे झाला. त्यांचे वडील कुंवर मृगेंद्र सिंह हे दोनवेळा काँग्रेसचे आमदार होते. मृगेंद्र सिंह हे रिवा घराण्याचे वंशज होते. त्यांच्या शहडोल येथील महालात कुटुंब राहते.

मधुलिका यांचे प्राथमिक शिक्षण शहडोलमध्ये झाले. चौथीनंतर ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध सिंधीया गर्ल्स हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश घेतला. तेथे त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्र विषयातून पदवी घेतली.

१९८६ मध्ये मधुलिका यांचे लग्न बिपीन रावत यांच्याशी झाले. त्यावेळी रावत हे सैन्यात कॅप्टन होते. रावत त्यावेळी सीमेवर तैनात असल्याने त्यांचे कुटुंब गावी राहत होते. त्यांच्या दोन मुलींची जबाबदारी मधुलिका यांच्यावर होती. रावत यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव कृतिका असून ती लग्नानंतर मुंबईत राहते. लहान मुलगी तारिणी अजून शिकत असून ती दिल्लीत आई वडिलांसोबत राहते.

Madhulika Rawat या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होत्या. सैन्यांच्या पत्नींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी नेहमी काम केले. विविध कोर्सेसच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवले. त्यांनी वीरपत्नींसाठीही विशेष काम केले.

रावत पहिले प्रमुख 

बिपीन रावत यांनी देशासाठी केलेल्‍या अतिविशिष्‍ट सेवेमुळे ३१ डिसेंबर २०‍१६ रोजी त्‍यांची लष्‍कर प्रमुखपदी नियुक्‍त करण्‍यात आले. १९९९ पाकिस्‍तानविरोधात कारगिल युद्‍ध झाले. या युद्‍धानंतर देशातील पायदल, नौदल आणि हवाई दलांमधील समन्‍वय साधण्‍यासाठी चीफ ऑफ डिफेन्‍स स्‍टाफ ( सीडीएस ) या पदाची निर्मिती करण्‍यात यावी, अशी शिफारस करण्‍यात आली होती. केंद्र सरकारने २०१९ मध्‍ये चीफ ऑफ डिफेन्‍स (सीडीएस) या पदाची निर्मिती केली.

लष्‍करप्रमुख म्‍हणून निवृत झाल्‍यानंतर केंद्र सरकारने ‘सीडीएस’ पदावर बिपीन रावत यांची नियुक्‍ती केली. देशाचे पहिले सीडीएस होण्‍याचा बहुमान त्‍यांना मिळाला होता.

हेही वाचा : 

Back to top button