हेलिकाॅप्‍टर अपघातासंदर्भात राजनाथ सिंग यांनी दिली लाेकसभेत माहिती, म्हणाले… | पुढारी

हेलिकाॅप्‍टर अपघातासंदर्भात राजनाथ सिंग यांनी दिली लाेकसभेत माहिती, म्हणाले...

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:  सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकाॅप्‍टर अपघातात निधन झाले. या घटनेसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज (दि.९)  लोकसभेत माहिती दिली. यावेळी त्यांनी रावत यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत त्‍यांना आदरांजली वाहिली.

राजनाथ सिंग म्हणाले, जनरल बिपीन रावत हे वेलिंगटन येथे आर्मी कॅडेटना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार जात होते. हे हेलिकॉप्टर १२.१५ मिनिटांनी कुन्नूर येथे लँड होणार होते. मात्र, तसे झाले नाही. काही वेळातच हेलिकॉप्टरचा यंत्रणेशी संपर्क तुटला.

बिपीन रावत यांना राजनाथ सिंग यांनी वाहिली आदरांजली

त्यानंतर काही वेळात कुन्नूरजवळील जंगलात मोठा स्फोटाचा आवाज झाला. प्राप्त माहितीनुसार १३ जणांचा यात मृत्यू झाला. दुर्दैवाने यात जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा यामध्‍ये समावेश आहे. या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे गंभीर जखमी असून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम होण्यासाठी वैद्यकीय पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे.

रावत यांच्यासोबत त्यांचा पर्सनल स्टाफ आणि अन्य अधिकारी मृत्यूमुखी पडले. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली आहे. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी घटनास्थळी गेले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शोकसंदेश वाचून दाखवत श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर लोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली.

बिपीन रावत यांची सेवा भारत विसरणार नाही

“जनरल बिपीन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, त्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन प्रामुख्याने अधोरेखित होते. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. भारताचे पहिले CDS म्हणून, जनरल रावत यांनी संरक्षण सुधारणांसह आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित विविध पैलूंवर काम केले. सैन्यात सेवेचा समृद्ध अनुभव त्यांनी सोबत आणला. त्यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही.”

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

बिपीन रावत हे शूर सैनिकांपैकी एक होते

“देशासाठी एक अतिशय दु:खद दिवस आहे. कारण आम्ही आमचे CDS, जनरल बिपीन रावतजी यांना अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे लष्करातील योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. मला अत्यंत दुःख होत आहे. श्रीमती मधुलिका रावत आणि इतर ११ सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांच्या दु:खद निधनाबद्दलही मी मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबियांसोबत संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. कॅप्टन वरुण सिंग लवकर बरा व्हावे, यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो.” – अमित शहा, गृहमंत्री.

हेही वाचलं का? 

Back to top button