Planes and helicopters crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातांचा प्रश्‍न चर्चेत | पुढारी

Planes and helicopters crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातांचा प्रश्‍न चर्चेत

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला बुधवारी अपघात झाला. या भीषण अपघातात जनरल रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा भारतातील लष्करी विमान अपघातांचा गंभीर प्रश्‍न समोर आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लष्कराच्या विमानांना तसेच हेलिकॉप्टर्सना (Planes and helicopters crash) झालेल्या अपघातांमध्ये अनेक दिग्गज अधिकार्‍यांना आपले प्राण गमवावे लागेल आहेत. खराब हवामानामुळेच बहुतांशवेळा विमाने आणि हेलिकॉप्टर्सना अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय हवाईदलाचे एएन-12 विमान 7 फेब्रुवारी 1968 रोजी चंदीगडहून लेहला जाताना खराब हवामानामुळे कोसळले होते. फ्लाईट लेफ्टनंट हरकेवाल सिंग आणि स्क्‍वाड्रन लीडर प्राण नाथ मल्होत्रा यांनी खराब हवामानामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. लेहच्या जवळ आल्यानंतर रोहतांगपासजवळ या विमानाशी शेवटचा रेडिओ संपर्क झाला होता.

घटनाक्रम

या विमानाचे अवशेष शोधण्यात अपयश आल्यानंतर त्याला बेपत्ता घोषित करण्यात आले होते. 2003 मध्ये दक्षिण डक्‍का ग्लेशियरवर ट्रेकिंग करणार्‍या गिर्यारोहकांच्या टीमला अपघातातील मानवी अवशेष आढळले होते. यामध्ये विमानात असणार्‍या बेली राम भारतीय यांचे अवशेष आढळले होते. 9 ऑगस्ट 2007 रोजी ऑपरेशन पुनरुथन-3 नावाच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेंतर्गत आणखी तीन मृतदेह सापडले होते. (Plane and helicopter crash)

भारतीय हवाई दलाच्या एएन -32 या विमानाला 3 जून 2019 रोजी अपघात झाला होता. यामध्ये सर्व 13 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्क्‍वाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाईट लेफ्टनंट आर. थापा, आशिष तंवर, एस. मोहंती, मोहित के. गर्ग, वॉरंट ऑफिसर के. के. मिश्रा, सार्जेंट अनुप कुमार, कोर्पोरेल शेरिन, एअर क्राफ्टमॅन एस. के. सिंह आणि पंकज के. यांच्याशिवाय इतर दोन जवान पुताली आणि राजेश कुमार यांचा समावेश होता.

21 ऑक्टोबर 2021 रोजी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे मिराज-2000 विमान कोसळले होते. 25 ऑगस्ट 2021 रोजी राजस्थानच्या बाडमेर येथे प्रशिक्षण मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले होते. 20 मे 2021 रोजी पंजाबच्या मोगा जिल्ह्यात मिग-21 विमानाला अपघात झाला होता.

यामध्ये भारतीय हवाई दलाच्या एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. 17 मार्च 2021 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे मिग-21 बायसन विमानाच्या अपघातात हवाई दलाच्या अधिकार्‍याचा मृत्यू झाला होता. 5 जानेवारी 2021 रोजी मिग-21 बायसन लढाऊ विमान राजस्थानच्या सूरतगडमध्ये लँडिंग करताना अपघातग्रस्त झाले होते. फेब्रुवारी 2019 मध्ये, भारतीय हवाई दलाच्या एरोबॅटिक टीमची दोन विमाने हवेत एकमेकांवर आदळल्यानंतर क्रॅश झाली होती, या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता.

ऑक्टोबर 2017 मध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने सुमारे सात जवानांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 2015 मध्ये दिल्ली विमानतळाजवळ निमलष्करी दलाचे विमान कोसळल्याने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) 10 जवान शहीद झाले होते.

दोन वर्षांत हवाई दलाची सात विमाने दुर्घटनाग्रस्त (Planes and helicopters crash)

गेल्या दोन वर्षांत भारतीय हवाई दलाची सात विमाने कोसळली असल्याची माहिती गेल्याच आठवड्यात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट संसदेत होती. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एरोस्पेस सेफ्टी ऑर्गनायझेशनला प्रोत्साहन देणे, अपघात आणि घटनांचा डेटा बेस राखणे, प्रशिक्षण पद्धती सुधारणे आणि सिम्युलेटरचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Back to top button