

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
नवे वर्ष सुरू व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत, मात्र आतापासूनच अनेक बदलांचे वारे वाहू लागले आहेत. नव्या वर्षाची नवी सकाळ अनेक नवे नियम घेवून येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक बँकांनी व्यवहाराचे नियम बदलले आहेत. जे १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. तीन मोठ्या खासगी बँकांशिवाय इंडिया पोस्ट बँक (India Post Payment Bank) ने देखील ट्रॅंजेक्शनच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या बँकेतूनच फक्त ४ ट्रँजॅक्शनच फक्त फ्री करता येणार आहेत. चार व्यवहारानंतर सर्व ट्रँजॅक्शनसाठी चार्जेस भरावे लागू शकतात. ट्रँजॅक्शन करणाऱ्यांना २५ रूपये प्रत्येक ट्रँजॅक्शनसाठी द्यावे लागू शकतात.
या नव्या नियमांचा जर आपल्या खिशावर इतका मोठा फरक पडणार असेल, तर मग जाणून घ्या कोणकोणत्या बँकांच्या ट्रँजॅक्शन नियमांमध्ये काय बदल होणार आहेत.
पोस्ट ऑफिसने बेसिक सेव्हिंग अकाउंटचे नियम पहिल्यासारखेच ठेवत, कॅश डिपॉझिट फ्री ठेवलं आहे. या खात्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही सेव्हिंग किंवा चालू खात्यातून २५ हजार रूपयापर्यंतची रक्कम काढणे फ्री आहे. यानंतर पैसे काढायचे असतील तर, चार्जेस भरावे लागतील. तुम्ही फक्त रोख रक्कम जमा केली नाही तरीही शुल्क आकारले जाईल. बेसीक सेव्हिंग अकाउंट शिवाय इतर कोणत्याही सेव्हिंग किंवा करंट अकाउंट मध्ये दहा हजारापेक्षा अधिक रक्कम जमा केल्यावर प्रत्येक वेळी २५ रूपयांपर्यंत शुल्क लागू शकते.
तीन खासगी बँकांनीही व्यवहारांचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ICICI बँकेच्या नवीन नियमांनुसार, पहिले पाच व्यवहार विनामूल्य असतील, तर त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाईल. प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क असेल, तर गैर-आर्थिक व्यवहारासाठी हे शुल्क प्रत्येक वेळी 8 रुपये 50 पैसे असेल.
एचडीएफसीने शहरांनुसार वेगवेगळे नियम ठरवले आहेत. पहिले तीन व्यवहार मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूर आणि हैदराबादसाठी मोफत आहेत. यानंतर, विनामूल्य मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी, प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये अधिक कर भरावा लागेल.
अॅक्सिस बँकेचाही नियम असाच आहे. अॅक्सिस बँकेने मोफत मर्यादेनंतर पैसे काढण्यासाठी 20 रुपये अधिक कराची तरतूद केली आहे. हे शुल्क आर्थिक व्यवहारांवर 5 मोफत मर्यादेनंतर लागू होईल. बिगर आर्थिक व्यवहारांसाठी दहा रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.