वैजापूर, पुढारी वृत्तसेवा :
प्रेमविवाह केल्यामुळे 19 वर्षीय विवाहित मुलीच्या खूनप्रकरणी आईला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मारेकरी लहान भावाला पोलिसांनी वैजापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अल्पवयीन ठरवून बाल न्यायमंडळात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील लाडगाव येथील अविनाश थोरे व कीर्ती मोटे या दोघांनी साधारणतः सहा महिन्यांपूर्वी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून कीर्तीच्या घरातील सदस्यांचा या विवाहासाठी विरोध होता. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कीर्तीची आई शोभा मोटे व लहान भाऊ हे दोघे गोयगाव येथून कीर्तीला भेटण्यासाठी तिच्या लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर गेले होते.
आई व भाऊ आल्यामुळे कीर्ती चहा ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. काही क्षणातच ते दोघे तिच्या मागून गेले व आई शोभा मोटे हिने तिचे पाय धरून ठेवले. लहान भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या डोक्यासह गळ्यावर सपासप वार करून मुंडके धडावेगळे केले. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने आपला मोर्चा तिचा नवरा अविनाश थोरे याच्या खोलीकडे वळविला. त्याने अविनाश याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला ; परंतु अविनाशने वार चुकून तो घराबाहेर पळाला.
त्यानंतर भावाने कीर्तीचे मुंडके हातात धरून घराबाहेरील ओट्यावर आणून ठेवले. घटनेनंतर आई शोभा मोटे व मारेकरी भाऊ दोघेही वैजापूर पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली; परंतु अविनाशने वार चूकून तो घराबाहेर पळाला. त्यानंतर भावाने कीर्तीचे मुंडके हातात धरून घराबाहेरील ओट्यावर आणून ठेवले. घटनेनंतर आई शोभा मोटे व मारेकरी भाऊ दोघेही वैजापूर पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.
घटना वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे वैजापूर पोलिसांनी दोघांनाही वीरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, याप्रकरणी मृत कीर्ती हिचा पती अविनाश थोरे (22 ) रा. लाडगाव शिवार याने दिलेल्या फिर्यादीवरून 5 डिसेंबर रोजी रात्री उशिरा शोभा संजय मोटे विरुध्द वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वीरगाव पोलिसांनी 6 डिसेंबर रोजी वैजापूर येथील न्यायालयात दोघांनाही हजर केले असता न्यायालयाने शोभा मोटे हिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मृत कीर्तीचा भावाच्या वयाबाबत पोलिसांना संभ्रम होता. त्यामुळे पोलिसांनी 5 डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी करून तो 18 वर्षे 7 महिन्याच्या असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. शाळेतील प्रवेश निर्गम उताऱ्याच्याअधारे पोलिसांनी त्याचे वय निश्चित केले;पण न्यायालयाने त्याच्या जन्माच्या दाखल्यानुसार त्याला अल्पवयीन ठरविले. त्यामुळे न्यायालयाने त्याला बाल न्यायमंडळात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
कीर्तीच्या खूनप्रकरणी तिची आई शोभा मोटे व लहान भावाला वैजापूर न्यायालयात हजर केले होते. तिच्या आईला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे तर लहान भावाला जन्माच्या दाखल्याआधारे न्यायालयाने अल्पवयीन ठरविल्याने त्याला
बाल न्यायमंडळात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
– कैलास प्रजापती, उपविभागीय पोलिस अधिकार
हेही वाचलं का?