Virat Kohli : विराट कोहलीची ‘वनडे’ कॅप्टनसी धोक्यात!, निवड समिती घेणार मोठा निर्णय | पुढारी

Virat Kohli : विराट कोहलीची ‘वनडे’ कॅप्टनसी धोक्यात!, निवड समिती घेणार मोठा निर्णय

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यासाठी क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय निवडकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विराट कोहलीच्या वनडे फॉरमॅटच्या कॅप्टनसीसह अजिंक्य रहाणेच्या कसोटी फॉरमॅटमधील उपकर्णधारपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह १०० कसोटी सामने खेळलेल्या इशांत शर्माच्या कसोटी संघातील स्थानाव्यतिरिक्त, अनुभवी सलामीवीर शिखर धवनचे वनडे संघातील पुनरागमन हाही या बैठकीत महत्त्वाचा मुद्दा असेल असा अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा अंदाज आहे.

वनखेडे मैदानातील कसोटी दरम्यान निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा, आबे कुरुविला आणि सुनील जोशी उपस्थित होते. हा सामना त्यांनी पाहिला आणि काही महत्त्वाच्या नोंदी काढल्या. यावर ते येत्या आठ दिवसात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. यात विराट कोहलीची (Virat Kohli) वनडे टीमची कॅप्टनसी कायम ठेवली जावी काय या मुद्द्याचाही समावेश असेल. या बैठकीतले निर्णय नंतर जाहीर करण्यात येतील. या निर्णयाचा भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम होईल अशीही शक्यता क्रिकेट तज्ज्ञांनी वर्तवली जात आहे.

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने होणार आहे. यापूर्वी हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता पण आता बॉक्सिंग डे कसोटीने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना प्रकारामुळे (ओमायक्रॉन) हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून तोपर्यंत परिस्थितीचा आढावा घेता येईल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने तयार केलेला बायो-बबल खेळाडूंसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल याची बीसीसीआयला पूर्ण खात्री आहे.

भारताला दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की टीम इंडियाला वनडे फॉरमॅटमध्ये विराट ऐवजी दुस-या कर्णधारांची गरज आहे का? विराट कोहलीने (Virat Kohli) टी-२० फॉरमॅटचे कर्णधार पद सोडल्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माकडे संघाच्या नेतृत्वाधी धुरा सोपवण्यात आली. विराट कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून अद्याप कायम आहे. पण तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार ठेवावा अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. त्याचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे रोहित शर्माकडे वनडे संघाचे कर्णधार पद सोपवावे असेशी मागणी होत आहे. अशातच २०२३ मध्ये होणार्‍या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय या फॉर्मेटमध्ये रोहितच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ टाकेल अशी चर्चा रंगली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिका-याने एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, ‘विराटला सध्या वनडे कर्णधारपद राखणे कठीण आहे. यावर्षी फार कमी वनडे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे वनडे फॉरमॅटला फारसे महत्त्व देण्यात येईल असे वाटत नाही. अशा स्थितीत कर्णधार पदाच्या निर्णयाबाबत विलंब होण्याची शक्यता आहे. टी २० आणि वनडे फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असणे संघासाठी अडचणीचे ठरू शकते. मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला टी २० सह वनडे संघाच्य कर्णधार पदाची ही जबाबदारी सोपवली जावी, जेणेकरून त्याला २०२३ पूर्वी संघ तयार करण्यासाठी आवश्यक वेळ मिळू शकेल, असे बहुतेकांना वाटते.’

Back to top button