पुणे / कात्रज : पुढारी वृत्तसेवा
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रभागा नगर चौकात काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षाचा तिघा अज्ञात दुचाकीस्वारांनी भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गोळ्या घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. समीर मनुर (वय ४० रा. आंबेगाव) असे खून झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे नाव आहे.
घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. भर दिवसा आणि गजबजलेल्या सातारा रस्त्यावर झालेल्या या घटनेने कात्रज आणि धनकवडी परिसरात खळबळ उडाली असून, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात समीरचा जागीच मृत्यू झाला आहे.
समीर मणूर यांची काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले होते. मणूर यांच्या खुनामागे नेमके काय कारण आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.