अर्थवार्ता : जीएसटीद्वारे सरकारच्या तिजोरीत 1.31 लाख कोटींचा महसूल | पुढारी

अर्थवार्ता : जीएसटीद्वारे सरकारच्या तिजोरीत 1.31 लाख कोटींचा महसूल

नोव्हेंबर महिन्यात जीएसटीद्वारे केंद्र सरकारच्या तिजोरीत 1.31 लाख कोटींचा महसूल जमा झाला. आजपर्यंतचे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात 1.41 लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले होते. आर्थिक वर्ष 2021-22 साठी मांडलेल्या बजेच्या अंदाजानुसार एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधी दरम्यान वित्तीय तुटीचे उद्दिष्ट संपूर्ण वर्षाच्या केवळ 36 टक्क्यांवरच पोहोचले. त्यामुळे यावर्षी वित्तीय तूट नियंत्रणात राहण्याच्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. सरकारकडे कर स्वरूपात जमा झालेला महसूल आणि सरकारकडून करण्यात येणारा खर्च यातील तफावत वित्तीय तूट दर्शवते.

येत्या सप्‍ताहात 6 ते 8 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक होणार आहे. जगभरात बँकांचे व्याजदर वाढवण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. रिझर्व्ह बँकसुद्धा महागाई नियंत्रणात आणण्याच्या द‍ृष्टीने रिव्हर्स रेपो रेट वाढवण्याच्या दिशेने पावले टाकू शकते. त्यामुळे बँकांना आणि इतर वित्तपुरवठा संस्थांना आगामी काळात अधिकच्या व्याजदराने पैसा उभा करावा लागू शकतो. म्हणूनच व्याजदर वाढण्याआधीच बँकांनी निधी उभारणीस प्राधान्य दिल्याचे दिसून येते. बीएसई व एनएसई बिडिंग प्लॅटफॉर्मवर मागील दोन सप्‍ताहात बँका आणि वित्त संस्थांनी एकूण 36747 कोटींचा निधी उभारला. यापैकी 14190 कोटींचा निधी उभारला. यापैकी 14190 कोटींचा निधी गृह वित्तपुरवठा कंपन्यांकडून, तर 9092 कोटींचा निधी गैरबँकिंग वित्तपुरवठा (एनबीएफसी) जमण्यात आला.

ओमायक्रॉन विषाणूचा भारतात शिरकाव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुपया चलन डॉलरच्या तुलनेत शुक्रवारच्या सत्रात 10 पैसे कमजोर झाले. रुपया डॉलरच्या तुलनेत 75.12 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. एकूण सप्‍ताहाचा विचार करता रुपया डॉलरच्या तुलनेत 23 पैसे कमजोर झाला.

हेल्थ इन्श्युरन्स क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी ‘स्टार हेल्थ इन्श्युरन्स’च्या आयपीओला थंड प्रतिसाद. आयपीओ केवळ 79 टक्के भरला. एकूण 7249 कोटींच्या आकाराच्या आयपीओमध्ये 4.49 कोटी समभागांसाठी केवळ 3.55 कोटी समभागांसाठीच मागणी (बिड्स) नोंदवली गेली. आयपीओच्या नोंदणीसाठीची कालमर्यादा अखेरच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर 2 तासांनी वाढवून देखील आयपीओ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास असमर्थ ठरला.

केंद्र सरकारकडून दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून घेण्यात येणार्‍या बँक गॅरंटीच्या रकमेत भरघोस 80 टक्क्यांनी कपात करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर याआधी घेतलेल्या अधिकच्या बँक गॅरंटी रकमेचा परतावा केंद्र सरकारकडून टेलिकॉम कंपन्यांना सुरू भारती एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांना 9 हजार कोटींच्या बँक गॅरंटीज परत करण्यात आले तसेच स्पेक्ट्रम लिलावाच्यावेळी घेण्यात येणार्‍या बँक गॅरंटी रकमाही लवकरच परत करण्यात येणार.

अनुत्पादित कर्जांसाठी रिझर्व्ह बँकेसाठी नवीन मानके/नियम नोव्हेंबर 12 रोजी घोषणा झालेल्या नियमानुसार एखाद्या अनुत्पादित बुडीत कर्ज खात्याचे रूपांतर सामान्य कर्ज खात्यात करायचे झाल्यास त्या कर्ज खात्याचे सर्व थकीत कर्जाचे हफ्ते व्याजासकट फेडले गेले पाहिजे. त्यानंतरच त्या बुडीत कर्ज खात्याला सामान्य कर्जखाते (स्टँडर्ड लोन अकाऊंट) असे म्हणता येईल. हा नवीन नियम लागू झाल्यास गैरबँकिंग वित्तपुरवठा (एनबीएफसी) कंपन्यांची अनुत्पादित कर्जे सुमारे 30 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज इंडिया रेटिग्स या पतमानांकन संस्थेने मांडला. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत देशातील बँकांकडून एकूण 46,382 कोटींची कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांनी दिली.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी या आर्थिक वर्षात 3.74 लाख कोटींचा निधी खर्चासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीचा प्रस्ताव संसदेपुढे ठेवला. केंद्र सरकारचे चालू वित्त वर्षामधील 1.75 लाख कोटींच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट यावर्षी पूर्ण होणे कठीण दिसत असल्याचे पाहून त्यांनी ही मागणी केली.

सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 8.4 टक्क्यांनी वाढला. मागील वर्षी याच तिमाहीत जीडीपी 7.4 टक्क्यांनी कमी झाला होता. तसेच नोव्हेंबर महिन्यात भारताची व्यापार तूट 23.3 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. एकूण 29.9 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली आणि 53.9 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली.

मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांची ‘अनिल धीरूभाऊ अंबानी’ उद्योग समूहाची वित्त कंपनी ‘रिलायन्स कॅपिटल’वर रिझर्व्ह बँकेची दिवाळखोरी प्रक्रिया (इन्सॉल्व्हसि प्रोसिडिंग) कारवाई सुरू. सप्टेंबर अखेरच्या आकडेवारीनुसार कंपनीवर 40 हजार कोटींचे कर्ज. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीला 9287 कोटींचा तोटा झाला होता.

26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी 2.713 अब्ज डॉलर्सनी घटून 637.687 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.
– प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

हेही वाचलंत का? 

Back to top button