

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन
राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे. या रुग्णाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण टांझानिया या देशातून परतला आहे. आत्तापर्यंत, कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या १७ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.
महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमधील रुग्ण बाधित झाला आहे. तो २४ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवरून डोंबिवलीमध्ये आला होता. बाधित रुग्णाचे वय ३३ आहे.
बाधित तरुणाने लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तो ३५ जणांच्या संपर्कात आला होता त्या सर्वांची तपासणी पूर्ण झाली आहे. बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून व्हाया दुबई मुंबईत आला होता.
भारतात (omicron variant in india) कोरोना विषाणूच्या नवीन ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची ही पाचवी घटना आहे. झिम्बाब्वेहून परतलेल्या एका तरुणाला गुजरातमधील जामनगरमध्ये ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तरुणाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी याची पुष्टी केल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
जामनगर येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला. यानंतर, आज नवीन ओमायक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी झाली. ओमायक्रॉनची लागण झालेली ही व्यक्ती जिथे राहते त्या ठिकाणाभोवती एक सूक्ष्म-कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे.