सांगली : परदेशातून आलेल्या ४५ जणांचा ठावठिकाणा सापडेना | पुढारी

सांगली : परदेशातून आलेल्या ४५ जणांचा ठावठिकाणा सापडेना

सांगली; पुढारी वृत्तसेवा

महापालिका क्षेत्रात विदेशातून आलेल्या 99 प्रवाशांची शोधमोहीम पूर्ण झाली आहे. विदेशातून आलेले 43 प्रवासी परत गेले आहेत, तर 45 प्रवाशांचा ठावठिकाणा सापडेना झाला आहे. उर्वरित 11 पैकी 5 प्रवाशांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये मध्य आफ्रिकेतून आलेल्या एका तरुणाचा समावेश आहे. विदेशातून आलेल्या 6 जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन व्हेरियंट’च्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा अ‍ॅलर्ट झाली आहे. विदेशातून महापालिका क्षेत्रात आलेल्या प्रवाशांची यादी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून महापालिकेला आली आहे. या यादीत 99 प्रवाशांचा समावेश आहे.

दोन दिवसांत शोधमोहीम पूर्ण आयुक्त नितीन कापडणीस यांनी विदेशातून आलेल्या 99 प्रवाशांचा शोध घेऊन उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी तातडीने 20 प्रभागासाठी 20 टीम नियुक्त करत 60 आरोग्य कर्मचार्‍याच्या मदतीने विदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू केला. शुक्रवार व शनिवारी 99 प्रवाशांची शोध मोहीम पूर्ण
झाली.

मोबाईल नंबर चुकीचे, अपुरा पत्ता विदेशातून आलेल्या 99 प्रवाशांपैकी 43 प्रवाशी विदेशात परत गेलेले आहेत, तर 45 प्रवाशांचा ठावठिकाणा सापडेना झाला आहे. मोबाईल नंबर चुकीचे, अपुरा पत्ता, चुकीचा पत्ता यामुळे या 45 व्यक्तींशी संपर्क होईना झाला आहे.
सध्या 11 व्यक्ती मनपा क्षेत्रात विदेशातून आलेले केवळ 11 प्रवाशी नागरिक सध्या महापालिका क्षेत्रात आहेत. त्यापैकी 5 व्यक्तींच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल आला आहे. सर्व पाचही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आल्या आहेत. यामध्ये मध्य आफिक्रेतून आलेल्या 30 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. दरम्यान विदेशातून आलेल्या 6 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील 6 व्यक्तींचे चाचणी अहवालही प्रलंबित आहेत.

संपर्क होऊ न शकलेल्या 45 प्रवाशी नागरिकांच्याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाला कळविले जाणार आहे, अशी माहिती डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

Back to top button