DDCC Bank : धुळे जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची सत्ता - पुढारी

DDCC Bank : धुळे जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची सत्ता

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (DDCC Bank) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने बँकेवर सत्ता राखली आहे. अध्यक्ष पद धुळ्यास तर उपाध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्यास मिळाले. अध्यक्षपदी राजवर्धन कदमबांडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. तर उपाध्यक्षपदी नंदुरबार जिल्ह्यातून दीपक पाटील यांचा विजय झाला आहे.

या झालेल्या निवडणुकीत संघर्ष पॅनलच्या वतीने (DDCC Bank) अध्यक्षपदासाठी शरद पाटील व उपाध्यक्ष पदासाठी आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केला होता. मतदारांनी मतदान केले. या मतदानात राजवर्धन कदमबांडे यांना 12 तर शरद पाटील यांना 5 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी दीपक पाटील यांना 12 तर आमशा पाडवी यांना 5 मते मिळाली. त्यामुळे संघर्ष पॅनलच्या शरद पाटील व आमशा पाडवी यांचा पराभव झाला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्या विश्वास दाखवल्याने त्यांचा विजय सोपा झाला आहे.

या जिल्हा बँकेचे (DDCC Bank) निवडणुकीकडे सुरुवातीपासूनच धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार अमरिषभाई पटेल, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील तसेच राज्याचे मंत्री के. सी. पाडवी यांनी निवडणूक बीनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मतदान घेण्यात आले. या झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक १२ सदस्य निवडून आणण्याचा दावा सर्वपक्षीय शेतकरी विकास केला होता. त्यांचा हा दावा संघर्ष पॅनेलने खोडला होता. मात्र आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतुन सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाल्याने संघर्ष पॅनलचा हा दावा खोटा ठरला आहे. निवड झाल्यानंतर बँकेच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यावर अनेक मान्यवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला.

यासंदर्भात अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी सांगितले की, या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या आशीर्वादाने व त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे माझा विजय झाला असून बँकेला अ वर्ग दर्जा कसा मिळेल, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रतिक्रिया दिली.

Back to top button