शिरोळ : पुढारी वृत्तसेवा :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ( kdcc bank election ) शिरोळ संस्था गटातून दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील हे बिनविरोध होणारच, असा विश्वास व्यक्त करून जिल्हा पातळीवरील राजकीय नेत्यांनी याबाबत ठाम व ठोस भूमिका न घेतल्यास शिरोळ तालुक्याची ताकत जिल्ह्याच्या राजकारणात दाखवून देऊ, असा इशारा मा. खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला.
जिल्हा बँक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर तमदलगे (ता. शिरोळ) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीवर कार्यकर्त्यांचा व ठराव धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेट्टी बोलत होते. मेळाव्याला 100 हून अधिक ठराव धारकासह तीन हजारहून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून ठराव धारकांना टोप्या घालून जनतेला टोपी घालणार नाही, असा विश्वास अर्ज दाखल करण्यापूर्वी समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असली तरी आपल्याकडे किती ठराव धारक आहेत याचे शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना संधी द्यायची नाही, अशा पद्धतीच्या गनिमी कावा केल्याचे दिसून आले. यावेळी शेती विभागाचे कर्मचारी, मा.आ.उल्हास पाटील, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, दिलीपराव पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, अशोकराव माने, धनाजीराव जगदाळे, चंगेजखान पठाण, अनिलराव यादव, महादेवराव धनवडे यांच्यासह विभाग प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.