राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ ; रजनी पाटील यांनी घेतली मराठीत शपथ | पुढारी

राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ ; रजनी पाटील यांनी घेतली मराठीत शपथ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : 

राज्‍यसभेच्‍या नवनियुक्त राज्यसभा सदस्यांनी आज शपथ घेतली. कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या रजीन पाटील यांच्यासह इतर नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. रजनी पाटील यांनी मराठीतून शपथ घेतली. यापूर्वी २०१३ ते २०१८ पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वर्तमान सदस्य तसेच माजी केंद्रीय मंत्री ऑक्सर फर्नांडीस तसेच पाच माजी सदस्यांना श्रद्धांजली दिल्यानंतर सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी राज्यसभा एक तासांसाठी स्थगित करण्यात आली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सभागृहातील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. तदनंतर सभापती एम.व्यैंकय्या नायडू यांनी ऑस्कर फर्नांडिस तसेच माजी सदस्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. १३ सप्टेंबर रोजी ८८ व्या वर्षी फर्नांडिस यांचे निधन झाले. फर्नांडिस यांनी राज्यसभेत चार वेळा कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. फर्नांडिस  यांच्या निधनाने देशातील बहुमुखी प्रतिभेचे धनी असलेले  खासदार, उत्कृष्ठ समाजसेवक तसेच एक कुशल प्रशासकाला गमावले’ अशी भावना सभापतींनी व्यक्त केली.

राज्यसभेचे माजी सदस्य के.बी.शानप्पा यांचे ९ मे २०२१ रोजी ८२ व्या वर्षी निधन झाले. विविध मुद्दयांवर आपले प्रखर मत मांडणारे प्रख्यात पत्रकार चंदन मित्रा देशील राज्यसभेचे सदस्य होते. १ सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, याची माहिती देखील सभापतींनी सभागृहाला शोक प्रस्तावातून दिली. सदनाचे माजी सदस्य हरीसिंह नलवा यांचे ८८ वर्षी ९ सप्टेंबर २०२१ रोजी, तर मोनिका दास यांचे ८२ व्या वर्षी ७ नोव्हेंबर २०२१ रोजी आणि अवनी राय यांचे ८२ व्या वर्षी २५ नोव्हेंबर २०२१ रोजी निधन झाले. सदनाने दिवंगत नेत्यांच्या सन्मानार्थ काहीवेळ मौन बाळगले. श्रद्धांजली दिल्यानंतर सभापती नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या सन्मानात सभागृहाचे कामकाज एक तासांसाठी स्थगित केले.

नवीन सदस्यांचा शपथविधी

सभागृहाचे कामकाज सुरू होताच नवनियुक्त राज्यसभा सदस्यांनी शपथ घेतली.कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या रजीन पाटील यांच्यासह इतर नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. रजनी पाटील यांनी मराठीतून शपथ घेतली. यापूर्वी २०१३ ते २०१८ पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत.

रजनी पाटील यांच्यानंतर द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) तामिळनाडूतून नवनिर्वाचित सदस्य कनिमोझी एन.वी.एन सोमू, के.आर.एन, राजेश कुमार तसेच एम.एम.अब्दुल्ला यांनी शपथ घेतली.या सर्व सदस्यांनी तामिळमध्ये शपथ घेतली.या शपथविधीनंतर सभागृहात डीएमके सदस्यांची संख्या दहा झाली आहे.कनिमोझी एन.वी.एन.सोमू माजी केंद्रीय मंत्री एन.वी.एन.सोनू यांच्या कन्या आहेत. तृणमूल कॉंग्रेसचे लुइजिन्हो फालेयरो यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. फालेयरो हे राज्यसभेत पश्चिम बंगाल चे प्रतिनिधित्व करणार आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापतींनी राज्यसभेचे नवीन महासचिव पी सी मोदी यांचा सदस्यांसोबत परिचय करवून दिला. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) माजी अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी १२ नोव्हेंबरला राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button