मुंबई; पुढारी ऑनलाईन
राज्य सरकारच्यावतीने मुंबईत चार दिवसांचे हिवाळी अधिवेशन (Winter session) घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र हा कालावधी खूपच कमी असून, तो कालावधी वाढवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरे देण्याची मानसिकता सरकारची दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने एकमताने घेतला होता. हे अधिवेशन येत्या डिसेंबर अखेरीस होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हिवाळी अधिवेशन नागपूरला येथे घेतले जाते. मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता हे अधिवेशन मुंबईतच घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. मात्र दुसरीकडे हे अधिवेशन मुंबईऐवजी नागपूरलाच व्हावे यासाठी भाजपचे नेते आग्रही आहेत.
या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) विविध मुद्यावरून राज्य सरकारला चांगलेच घेरले.
सरकारच्यावतीने हिवाळी अधिवेशन चार दिवस घेणार असल्याचे कळते. मात्र राज्यातील विविध विषयांच्या अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी हा वेळ पुरेसा नाही. विषय भरपूर आहेत पण दिवस कमी आहेत. या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आम्ही सरकारकडे मागणी केली आहे. पण अधिवेशन घ्यायचीच सरकारची मानसिकता दिसत नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
आपल्या आग्रहास्तव अधिवेशनाचा कालावधी वाढवता येतो का यावर बैठक घेण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्याचबरोबर सरकारने दोन वर्षात एकाही तारांकीत अथवा लक्षवेधी प्रश्नाला सरकारने उत्तर दिले नसल्याचं त्यांनी सांगितले. नागपुरात अधिवेशन होत नसल्याने सरकार फसवत असल्याची विदर्भाची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा