IND vs NZ Test : भारताविरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णीत | पुढारी

IND vs NZ Test : भारताविरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णीत

कानपूर : पुढारी ऑनलाईन

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे रोमहर्षक लढतीत भारत विजयापासून एक विकेट दूर राहिला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या पर्वातील भारताचा दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात किवी संघासमोर २८४ धावांचे लक्ष्य होते आणि संघाने शेवटच्या दिवशी दमदार फलंदाजी करताना सामना अनिर्णित ठेवला. सामना ड्रॉ करण्यासाठी पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने ९१ चेंडू खेळून नाबाद १८ धावा काढल्या. तर त्याला एजाज पाटेलने साथ दिली आणि सामना अनिर्णित राखण्यात मोठी भूमिका बजावली. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी एकूण ५२ चेंडूंचा सामना केला आणि पराभव टाळला.

२८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९८ षटके फलंदाजी केली आणि ९ विकेट गमावल्या. शेवटच्या ५२ चेंडूतही भारतीय गोलंदाजांना शेवटची विकेट काढता आली नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. भारतात २०१७ नंतर पहिल्यांदाच कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या संघाने गेल्या सात सामन्यांमध्ये प्रथमच एक सामना अनिर्णित ठेवला आहे.

रचिनने न्यूझीलंडला वाचवले

या सामन्यात न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने शानदार खेळ दाखवत संघाला पराभवापासून वाचवले. रचिन ९१ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. त्याची ही संयमी खेळी संघासाठी मोलाची ठरली. त्याच्या बचावात्मक खेळामुळे भारतीय संघ शेवटची विकेट घेऊ शकला नाही. भारताकडे जवळपास ९ षटकांचा खेळ शिल्लक होता; ज्यामध्ये त्यांना शेवटची विकेट घ्यायची होती. परंतु रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल अपयशी ठरले. रचिनने या तिघा गोलंदाजांना कडवी झुंज दिली, ज्यात तो यशस्वीही झाला.

न्यूझीलंडचा दुसरा डाव : ९ विकेट्स

सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने २८४ धावांचा पाठलाग करताना शानदार खेळ केला. टॉम लॅथम आणि विल्यम सोमरविले यांनी ३१ षटकांत ७५ धावा जोडल्या. मात्र, उपाहारानंतर उमेश यादवने पहिल्या चेंडूवर ३६ धावांवर नाईट वॉचमन विल्यम सोमरविलेला शुभमन गिलकडे झेलबाद केले. भारताला तिसरे यश आर अश्विनने मिळवून दिले ज्याने टॉम लॅथमला ५२ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले.

टी ब्रेकपूर्वी रवींद्र जडेजाने भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने रॉस टेलरला २ धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. भारताला इथून विजयासाठी ६ विकेट्सची गरज होती आणि खेळण्यासाठी जवळपास ३० षटके बाकी होती. चहापानानंतर लगेचच अक्षर पटेलने भारताला पाचवे यश मिळवून दिले. अक्षर पटेलने हेन्री निकोल्सला १ धावेवर एलबीडब्ल्यू आऊट केले. यासह भारताने सामन्यात पुनरागमन केले.

रवींद्र जडेजाने भारताला सहावे आणि मोठे यश मिळवून दिले. जडेजाने केन विल्यमसनला २४ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह भारताने सामन्यावर पकड मिळवली. ब्लंडेलच्या रुपात न्यूझीलंडची सातवी विकेट पडली. त्याने २ धावा केल्या. त्याला आर अश्विनने बाद केले. रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा भारतीय संघाला आठवे यश मिळ्वून दिले. त्याने काईल जेमिसनला एलबीडब्ल्यू बाद केले.

टीम साऊथीला ४ धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केल्यावर रवींद्र जडेजाने भारताला नववे यश मिळवून दिले. भारताकडून या सामन्यात रवींद्र जडेजाने चार, आर अश्विनला तीन आणि अक्षर पटेल आणि उमेश यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

साउदी बाद, न्यूझीलंडला नववा धक्का…

जडेजाने टिम साउदीला बाद करून न्यूझीलंडला नववा झटका दिला. साउदीने ४ धावा केल्या.

किवीची ८ वी विकेट…

८६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविंद्र जदेजाने जेमिसनला चकवले आणि पायचित केले. जेमिसनने ३० चेंडूत ५ धावा केल्या

अश्विनने ब्लंडलची घेतली विकेट..

७६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टॉम ब्लंडलविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील करण्यात आले, परंतु पंचांनी आऊट दिला नाही. कर्णधार रहाणे आणि अश्विनने चर्चा केली आणि तत्काळ रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये तो बाद नसल्याचे स्पष्ट दिसले. पण त्यानंतर अश्विनने त्याच्या पुढच्याच षटकात ब्लंडलला (२) बोल्ड करून टीम इंडियाला ७ वे यश मिळवून दिले.

पुन्हा एकदा जडेजा… केन विल्यमसन बाद…

७० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रविंद्र जडेजाने किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. ही त्याची वैयक्तीक दुसरी विकेट आहे. केन विल्यमसनने ११२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या.

 • केन विल्यमसनची ही १५० वी कसोटी खेळी होती.
 • किवी कर्णधार विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० चौकार पूर्ण केले.

अक्षरची जादू सुरू…

टी-ब्रेकनंतर पहिल्याच षटकात अक्षर पटेलने हेन्री निकोल्सला (१) एलबीडब्ल्यू करून किवी संघाचे कंबरडे मोडले. त्यामुळे न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परतला.

रविंद्र जडेजा ऑन फायर…

डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने भारताला चौथे यश मिळवून देत रॉस टेलरचा (६ चेंडूत २ धावा) अडसर दूर केला आहे. त्याने ६४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टेलरला बाद केले. यानंतर लगेचच टी-ब्रेक घेण्यात आला. सामन्यात अजून ३१.५ षटके खेळायची आहेत आणि किवींना १५९ धावांची आणि भारताला विजयासाठी ६ विकेट्स गरज आहे.

आर अश्विनची दुसरी विकेट..

५४.२ व्या षटकात न्यूझीलंडला तिसरा झटका बसला. आर. अश्विनने टॉम लॅथमची विकेट घेत भारताला आणखी एक यश मिळवून दिले. अर्धशतक झळकावल्यानंतर अश्विनने लॅथमला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. या विकेटसह आर अश्विन टीम इंडियासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे. त्याने हरभजन सिंगचा (४१७) विक्रम मोडला आहे. लॅथमने ५२ धावांची शानदार खेळी केली. लॅथम आणि विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. न्यूझीलंडची तिसरी विकेट ११८ धावांवर पडली, आता रॉस टेलर कर्णधार विल्यमसनला साथ देण्यासाठी क्रीजवर आला आहे.

टॉम लॅथमचे अर्धशतक…

न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथमने दुस-या डावातही अर्धशतकी खेळी साकारली. ५१ षटकाच्या सहाव्या चेंडूवर तेन धावा घेत त्याने १३८ चेंडूत ५२ धावा केल्या आणि अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या डावात त्याचे पाच धावांनी शतक हुकले होते. त्याने २८२ चेंडूत ९५ धावा काढल्या होत्या. अक्षर पटेलच्या फिरकीवर बदली विकेटकिपर भरतने त्याला यष्टीचित केले होते.

 • लॅथमचे हे २२ वे आणि भारताविरुद्धचे सातवे अर्धशतक आहे.
 • टॉम लॅथमने तिसऱ्यांदा कसोटीच्या दोन्ही डावात ५०+ धावा केल्या.

भारताला दुसरे यश… उमेश यादवने करून दाखवले

लंचब्रेकनंतर सामना सुरू झाला. कर्णधार अजिंक्य रहाणेने वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या हाती चेंडू दिला. उमेशने रहाणेच्या विश्वासाला पात्रठरत पहिल्याच चेंडूवर नाईट वॉचमन सोमरविलेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सोमरविले ३६ धावा काढून पायचीत झाला. सोमरविलेने टॉम लॅथमसह दुसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत ७६ धावांची भागिदारी केली. सामन्यात पुनरागमन करण्यासाठी ही भागीदारी तोडणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे होते. ते उमेश यादवने करून दाखवले आहे.

भारताने रिव्ह्यू गमावला…

१९ वे षटक टाकणाऱ्या रवींद्र जडेजाने चौथ्या चेंडूवर लॅथमविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील केले. पण मैदानी पंचांनी तो बाद नसल्याचा निर्णय दिला. भारतीय खेळाडूंनी चर्चा करून तत्काळ रिव्ह्यू घेतला. त्यानंतर रिप्लेमध्ये तो नॉट आउट असल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय योग्य ठरवत लॅथम नाबाद असल्यावर शिक्कामोर्तब केला.

आजपर्यंत भारतीय मैदानावर २८० च्या वरील स्कोअर कधीही चेस केला गेलेला नाही. दोनशेच्या वरचा आकडा दोनदाच गाठला गेला आहे. १९८७ मध्ये वेस्ट इंडिजने दिल्लीत २७६ धावांचे लक्ष्य पार करून सामना जिंकला होता आणि १९७२ मध्ये इंग्लंडने दिल्लीतच ४ विकेटवर २०८ धावा करून भारताचा पराभव केला होता. मात्र, कानपूरमध्ये न्यूझीलंडने चौथ्या डावात फलंदाजी करण्याचा अनोखा विक्रम केला आहे, तोही ४५ वर्षांपूर्वी. न्यूझीलंडने १९७६ मध्ये ग्रीन पार्क मैदानावर ११७ षटके फलंदाजी करत ७ विकेट गमावून १९३ धावा केल्या होत्या.

IND vs NZ Test Day 5

 • ६९.१ व्या षटकात जडेजाने विल्यमसनला बाद केले. आपल्या फिरकीने अप्रतिम कामगिरी दाखवणाऱ्या जडेजाने अनुभवी फलंदाज विल्यमसनला बाद करून न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. विल्यमसन एलबीडब्ल्यू बाद झाला.
 • ६४.१ व्या षटकात न्यूझीलंडला पाचवा धक्का : निकोल्सला बाद करून अक्षर पटेलने न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. निकोल्स १ धावा काढून पटेलच्या चेंडूवर पायचित झाला. तेव्हा भारताला कसोटी सामना जिंकण्यासाठी ५ विकेट्सची गरज होती.
 • चहापानापर्यंत न्यूझीलंडने ४ विकेट गमावल्या होत्या. ६३.१ व्या षटकात न्यूझीलंडला चौथा धक्का बसला. जडेजाने चहापानाच्या विश्रांतीपूर्वी टेलरची विकेट घेत भारताला मोठे यश मिळवून दिले. टेलरने २४ चेंडूत २ धावा केल्या.
 • अश्विनने हरभजन सिंगचा विक्रम मोडला : आर. अश्विनने हरभजन सिंगचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम मोडला आहे. आता अश्विनच्या नावावर ४१८ कसोटी विकेट्स आहेत. तर, हरभजन सिंगच्या नावावर कसोटीत ४१७ विकेट्स आहेत.
 • ५४.२ व्या षटकात लॅथमची विकेट : अर्धशतक झळकावल्यानंतर अश्विनने लॅथमला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लॅथमने ५२ धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडची तिसरी विकेट ११८ धावांवर पडली. त्यानंतर रॉस टेलर मैदानात उतरला.
 • कर्णधार विल्यमसन क्रीजवर : सोमरविले बाद झाल्यानंतर कर्णधार विल्यमसन लॅथमला साथ देण्यासाठी आला.
 • ३५.१ व्या षटकात न्यूझीलंडची दुसरी विकेट : दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर सोमरविलेला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. सोमरविले ३६ धावा करून बाद झाला. यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ७९ होती.
 • ३५ व्या षटकांनंतर लंच ब्रेक घेण्यात आला. त्यामुळे खेळ थांबला आहे. या वेळेपर्यंत न्यूझीलंडने १ बाद ७९ धावा केल्या. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवता आली नाही. न्यूझीलंडचे फलंदाज लॅथम आणि सोमरविले कडवी झुंज दिली. दोघांनी१९३ चेंडूत ७६ धावांची भागिदारी केली. त्यावेळी लॅथम ३५ (९६ चेंडू) आणि सोमविले ३६ (१०९ चेंडू) धावांवर खेळत होते. पाचव्या दिवसाचे पहिले सत्र पूर्णपणे न्यूझीलंडच्या नावावर राहिले. न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि नाईट वॉचमन विल्यम सोमरविले यांनी भारतीय गोलंदाजांना घाम फोडला.

 • ३० षटकांनंतर न्यूझीलंडने १ बाद ६३ धावा केल्या. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. लॅथम आणि सोमरविले कडवी झुंज देत आहेत.
 • पहिल्या तासाच्या खेळानंतर अक्षर पटेलला आक्रमणाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेलने पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या. आजही त्याच्या फिरकीची जादू चालणार का? याकडे भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत.
 • न्यूझीलंडचे अर्धशतक : पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा जोरदार सामना केला. संघाच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत. सोमरविले आणि लॅथम यांच्या संयमी खेळीने भारतीय संघाचे टेन्शन वाढवले आहे. दोघांमध्ये ५० धावांची भागिदारी पूर्ण झाली आहे.

Image

 • भारताचा पहिल्या तासात विकेट नाही : विल्यम सोमरविले आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या तासात चांगली फलंदाजी केली. त्यांनी संयमी खेळ केला आणि विकेट पडू दिली नाही. दोघे फलंदाज चुकीचे शॉट्स खेळतानाही दिसत आहेत. पण सध्या ते बाद होण्यापासून वाचत आहेत.

 • इशांत शर्मा पुन्हा मैदानात परतला आहे. इशांतने न्यूझीलंडच्या डावातील १४ वे षटक फेकले. न्यूझीलंडने १४ षटकांत १ गडी बाद ३२ धावा केल्या.
 • गोलंदाज इशांत शर्मा जखमी : भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. इशांत शर्मा क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू रोखण्यासाठी डायव्हिंग करताना इशांतच्या बोटाला दुखापत झाली. इशांत सध्या मैदानाबाहेर आहे.
 • नऊ षटके संपल्यानंतर न्यूझीलंडची धावसंख्या एका विकेटवर १७ आहे. टॉम लॅथम सात आणि विल्यम सोमरविले सहा धावा करत खेळत आहे. भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे.
 • केएस भरत पाचव्या दिवशी यष्टिरक्षण करत आहे. दुसऱ्या डावात कीपिंग करताना ऋद्धिमान साहाला मानेत दुखापत झाली होती. त्यामुळे विकेटकिपिंगदरम्यानच्या हालचालींवर परिणाम होत होता. त्यामुळे केएस भरतला बदली विकेटकिपरला मैदानात उतरवण्यात आले होते. आजही तोच विकेटकिपिंग करत आहे.

 

Back to top button