'ओमिक्रॉन विषाणू'च्या पार्श्वभूमीवर WHO ने स्पष्ट केल्या या ५ महत्वाच्या गोष्टी | पुढारी

'ओमिक्रॉन विषाणू'च्या पार्श्वभूमीवर WHO ने स्पष्ट केल्या या ५ महत्वाच्या गोष्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ हा नवीन प्रकार इतर विषाणूंपेक्षा अत्यंत घातक आणि वेगाने पसरणारा असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सल्लागार समितीने चिंता व्यक्त केली आहे.

‘ओमिक्रॉन विषाणू’ हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळला. तेव्हापासून संपूर्ण जगाने पुन्हा एकदा धास्ती घेतली आहे. या विषाणूला आपापल्या देशात प्रवेश करण्यापासून कसे रोखता येईल यासाठी देश प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, या विषाणूच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने प्रमुख पाच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

१. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, ‘ओमिक्रॉन विषाणू’ विषाणू संसर्गाच्या प्राथमिक पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, ज्या लोकांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाला आहे त्यांना कोरोनाच्या या नवीन प्रकाराने पुन्हा संसर्ग होऊ शकतो. या प्रकारात पुन्हा संसर्ग होण्याचा धोका कायम आहे.

२. डेल्टा आणि कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ‘ओमिक्रॉन’ हा प्रकार अधिक संक्रमणक्षम (एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पसरणारा) आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या ते फक्त आरटी-पीसीआर चाचणीद्वारे त्याला शोधले जाऊ शकते.

३. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकाराचा कोविड-19 लसीवर काय परिणाम होईल हे शोधण्यासाठी WHO सध्या काम करत आहे.

४. ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. ‘ओमिक्रॉन’शी संबंधित लक्षणे इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत हे देखील अद्याप दिसून आलेले नाही.

५. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या प्राथमिक आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या या प्रकाराचे गांभीर्य समजण्यासाठी अनेक दिवस ते अनेक आठवडे लागू शकतात.

हेही वाचा

व्हिडिओ पहा : शक्ती मिल बलात्कार प्रकरण : 7 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

Back to top button