RT-PCR चाचण्या वाढविण्यासह अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिलन्स सुरू करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश | पुढारी

RT-PCR चाचण्या वाढविण्यासह अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिलन्स सुरू करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे सावट पसरलेले आहे. केंद्र सरकारने राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आणि चाचण्या वाढविण्याचे निर्देश रविवारी दिले. आवश्यकता असेल तेथे क्‍वारंटाईन आणि आयसोलेशन कठोरपणे लागू करण्यात यावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी रविवारी राज्य सरकारांना दिलेल्या निर्देशांतून स्पष्ट केले. सर्व राज्यांनी आरटी-पीसीआर चाचण्या वाढविण्याचे तसेच अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिलन्स सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. (RTPCR-Surveillance)

राज्यांसाठीची नियमावली

1) ‘ओमिक्रॉन’ची लागण कुणाला झालेली असल्यास ती त्वरित कळावी म्हणून चाचण्या तसेच चाचण्यांचे अहवाल जिनोम सिक्‍वेन्सिंगसाठी पाठविण्याची प्रक्रिया वेगात पार पाडणे आवश्यक.

2) ज्या ज्या देशांतून ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळले आहेत, त्या देशांतून भारतात दाखल होणार्‍या प्रवाशांना क्‍वारंटाईन करणे, त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करणे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर देखरेख ठेवणे.

3) आंतरराष्ट्रीय विमानांतून येणार्‍या प्रवाशांच्या एकूण संपूर्ण आंतरराष्ट्रीय प्रवासाची (ट्रॅव्हल हिस्ट्री) माहिती उपलब्ध होण्याचे तंत्र आधीपासूनच सर्व राज्यांकडे उपलब्ध आहे. त्याचा वापर प्रत्येक प्रवाशाबाबत करावा.

4) कोरोना काळातील अपेक्षित वर्तनाची अंमलबजावणी करावी. कंटेन्मेंट, सर्व्हिलन्स वाढवण्यात यावेत. लसीकरणाची व्याप्‍ती वाढवावी.

5) चाचणीसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध ठेवावी. पुरेशा चाचण्या आणि तपासणीअभावी संक्रमणाची नेमकी पातळी कळणे अवघड होईल.

6) हॉटस्पॉट्सवर लक्ष ठेवावे. एखाद्या भागात रुग्णसंख्या वाढल्यास तो भाग नजरेखाली ठेवला जावा. हॉटस्पॉटमधील सर्व नमुने जिनोम सिक्‍वेन्सिंगसाठी पाठवावेत. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांवर कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही, हे पाहावे.

7) आरोग्य सुविधा तत्पर ठेवाव्यात. रुग्णांवर उपचार वेळेत होतील, याची दक्षता घ्यावी.

8) चाचण्या तसेच जिनोम सिक्‍वेन्सिंगच्या माध्यमातून विषाणूत होणार्‍या बदलांवर लक्ष ठेवावे.

‘इन्साकॉग’ला उपयुक्‍त बनवा’

विषाणूत होणारे बदल टिपण्यासाठी ‘इन्साकॉग’(इंडियन सार्स-कोव्हिड-2 जिनोमिक्स कन्सोर्टियम) ही बहुआयामी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. ‘इन्साकॉग’च्या माध्यमातून या बदलांवर नजर ठेवण्यात आपापल्या भागातील नमुने गोळा करून ते पाठविण्याचे काम राज्यांनी जास्तीत जास्त करावे, असेही निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. (RTPCR-Surveillance)

हे ही वाचा

Back to top button