Shreyas Iyer : श्रेयसकडून इतिहासाची पुनरावृत्ती, ५० वर्षांनंतर ‘असं’ करणारा पहिला भारतीय | पुढारी

Shreyas Iyer : श्रेयसकडून इतिहासाची पुनरावृत्ती, ५० वर्षांनंतर ‘असं’ करणारा पहिला भारतीय

कानपूर : पुढारी ऑनलाईन

श्रेयस अय्यरने कानपूर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत लक्ष्यवेधी फलंदाजी करत क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. भारतीय संघ पहिल्या आणि दुस-या डावात संकटात सापडला होता. टॉप ऑर्डर फेल झाली होती. अशावेळी एक संकटमोचक म्हणून त्याने संघाला सावरले आणि मोठी धावसंख्या धावफलकावर झळकवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. भारताच्या दुस-या डावात अय्यर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा संघाची अवस्था बिकट होती. अवघ्या ५१ धावा करून अव्वल ४ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर अय्यरने रविचंद्रन अश्विनसोबत सहाव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋद्धिमान साहासोबत सातव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली.

अय्यरने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावण्यात त्याने यश मिळवले. तो पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावातही ६५ धावा करून बाद झाला. ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय फलंदाजाने पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ५० हून अधिक धावा केल्या आहेत. ५० वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांनी कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावात ५० प्लस धावा केल्या होत्या.

गावसकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत अनुक्रमे ६५ आणि ६७ धावा केल्या होत्या. आता अय्यरने त्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीशिवाय, पदार्पणाच्या कसोटीच्या एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा श्रेयस अय्यर पहिला भारतीय तर जगातील दहावा खेळाडू ठरला आहे. अय्यरने पहिल्या डावात १७१ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात अय्यरने १२५ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६५ धावा केल्या.

विशेष बाब म्हणजे अय्यर जेव्हा कसोटी सामन्याच्या पदार्पणासाठी सज्ज होता तेव्हा त्याला भारतीय संघाची कॅप खुद्द सुनील गावस्कर यांनी दिली होती. त्यावेळी गावसकर यांनी अय्यरला एक खास सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, भविष्याचा विचार न करता वर्तमानात तुमच्या खेळाचा आनंद घ्या, असं सांगितलं होतं.

अय्यर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू

श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात १७० धावा केल्या. असे करून त्याने लाला अमरनाथ यांचा विक्रम मोडीत काढला. अमरनाथ यांनी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात १५६ धावा केल्या. तसे, शिखर धवनने भारतासाठी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत. धवनने पदार्पणाच्या कसोटीत १८७ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात १७७ धावा करत अप्रतिम कामगिरी केली.

कानपूर कसोटी सामन्यात, अय्यरने पहिल्या डावात शानदार १०५ धावा केल्या आणि भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला. आता दुसऱ्या डावात अय्यरने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी खेळली भारताचा डाव सांभाळला.

१९३४ मध्ये कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या सामन्यात भारताचा सलामीवीर दिलावर हुसेन यांनी पहिल्या डावात ५९ आणि दुसऱ्या डावात ५७ धावा केल्या होत्या. यानंतर, सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे भारताकडून कसोटी पदार्पण करताना पहिल्या डावात ६५ धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद ६७ धावा केल्या.

Back to top button