Honey Trap case : ज्येष्ठांवर लावला जातोय ‘हनी ट्रॅप’

Honey Trap case  : ज्येष्ठांवर लावला जातोय ‘हनी ट्रॅप’
Published on
Updated on

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : 'हनी ट्रॅप'च्या (Honey Trap case ) घटना सध्या सातत्याने उघड होत आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांवर कटाक्ष टाकला; तर लक्षात येईल की, यातील सर्वाधिक ट्रॅप ज्येष्ठांवर, त्यातही एकटे राहणार्‍यांवर लावल्याचे दिसते. सोशल मीडियावर फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठवून नंतर चॅटिंग वाढवत तपशीलवार माहिती काढायची, सावज जाळ्यात ओढता येते, अशी खात्री झाली की, अश्‍लील संभाषण वाढवत त्याचे व्हिडीओ चित्रण करायचे. मग ब्लॅकमेलिंग करत मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचे, असे प्रकार समोर आले आहेत.

ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे एस. कुमार (बदललेले नाव) हे 63 वर्षीय सेवानिवृत्त नागरिक. ते एका उच्चभ्रू सोसायटीत 2 बीएचके फ्लॅटमध्ये एकटे राहतात. त्यांचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे. त्यांना काही महिन्यांपूर्वी एका महिलेची फ्रेंड रिक्‍वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारली. काही दिवसांतच महिलेने मेसेंजरच्या माध्यमातून चॅटिंग सुरू केले. एकटे आहात का? तुम्हाला कुणाशी बोलावेसे वाटत असेल तर मी बोलेन, असे ती म्हणाली. ही महिला रात्री तासन्तास चॅटिंग करू लागली. एकेदिवशी तिने व्हिडीओ चॅटिंगच्या माध्यमातून आक्षेपार्ह अवस्थेत चॅटिंग सुरू केली. नंतर तिने एस. कुमार यांनाही तसेच करण्यास भाग पाडले.

आक्षेपार्ह व्हिडीओची स्क्रीन रेकॉर्डिंग करून त्यांना तो व्हिडीओ महिलेने पाठवला. काही लाख रुपये न दिल्यास ही रेकॉर्डिंग सोशल मीडियात व्हायरल करू, अशी धमकी दिली. प्रकरणाची वाच्यता नको म्हणून घाबरून या ज्येष्ठाने या महिलेला काही लाख रुपये ऑनलाईन दिले. मात्र, या महिलेने वारंवार ब्लॅकमेल करीत त्यांच्याकडून जवळपास तब्बल 41 लाख रुपये उकळले.

शेवटी संबंधित ज्येष्ठ नागरिकाने या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. ब्लॅकमेल करणार्‍या या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

'हनी ट्रॅप'च्या अशा घटना गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या लढवत आहेत.

आणखी एक 'हनी ट्रॅप'ची (Honey Trap case) घटना श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली. या घटनेत टिंडर आणि जायुमो चॅटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून नागरिकांना लुटणार्‍या तीन महिलांसह सातजणांच्या टोळीला अटक केली आहे. या घटनेतील महिलेने टिंडर अ‍ॅपवरून निशा नावाने चॅटिंग केली. फिर्यादीशी ओळख वाढवली. नंतर शरीरसुखाचे प्रलोभन दाखविले. भेटण्यासाठी बोलावले. तक्रारदार घटनास्थळी गेले. तेथे उपस्थित असलेल्या टोळीने त्यांना मारहाण केली. खोलीत डांबले. बलात्काराची केस दाखल करण्याची भीती घातली. त्यांच्याकडून दागिने, एटीएम, क्रेडिट कार्ड काढून घेत त्यांच्या खात्यातील रक्‍कम काढली. पोलिसांनी आरोपींना शिताफीने अटक केली.

लॉकडाऊननंतर वाढले ब्लॅकमेलिंग

लॉकडाऊनचा अनेकांना मोठा फटका बसला. अशा स्थितीत सायबर गुन्हेगारांनी आपला उपद्रव वाढवला आहे. दोन दिवसांत तुमचा पीएफ मिळवा, बिनव्याजी कर्ज, आयकर व इतर टॅक्सचा रिफंड, शासकीय विभागात मेगा भरती, लोनच्या हप्त्यांना स्थगिती, घरबसल्या पैसे मिळवा, डेबिट कार्ड व बँक खाते पडताळणीचे फेक कॉल, पोर्नोग्राफी साईटच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग अशा एक ना अनेक फसवणुकीच्या क्लृप्त्या या गुन्हेगारांनी शोधल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news