Stock Market Crash | शेअर बाजारात चौफेर विक्रीचा मारा! स्मॉल, मिडकॅपची दाणादाण, गुंतवणूकदारांच्या १४ लाख कोटींचा चुराडा | पुढारी

Stock Market Crash | शेअर बाजारात चौफेर विक्रीचा मारा! स्मॉल, मिडकॅपची दाणादाण, गुंतवणूकदारांच्या १४ लाख कोटींचा चुराडा

पुढारी ऑनलाईन : मिड आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील जोरदार विक्रीमुळे बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल १,१०० हजार अंकांनी घसरून ७२,७०० च्या खाली आला. तर निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह २२ हजारांच्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ९०६ अंकांच्या घसरणीसह ७२,७६१ वर स्थिरावला. तर निफ्टी ३३८ अंकांनी घसरून २१,९९७ वर बंद झाला.

आजच्या सत्रात स्मॉल, मिडकॅपची दाणादाण उडाली. बीएसई मिडकॅप ४.२ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप ५.११ टक्क्यांनी घसरून बंद झाला. निफ्टी एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्रांत आज घसरण झाली. निफ्टी मीडिया, मेटल आणि रियल्टी निर्देशांकांना सर्वाधिक फटका बसला. ते प्रत्येकी सुमारे ५ टक्क्यांनी घसरले.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आज स्मॉल कॅप निर्देशांक ५ टक्क्यांपर्यंत घसरला. या निर्देशांकाची डिसेंबर २०२२ नंतर ही एका दिवसातील खराब कामगिरी आहे. तर मिडकॅप ३ टक्क्यांनी खाली आला. तर मायक्रोकॅप्स आणि एसएमई स्टॉक्स निर्देशांक प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले. आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १३ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ३७२ लाख कोटींवर आले. (Stock Market Crash)

जागतिक बाजारातून मजबूत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या खरेदीच्या जोरावर आज शेअर बाजार तेजीत खुला झाला होता. विशेषतः आयटीसी शेअर्समधील खरेदीचा बाजाराला सपोर्ट मिळाला होता. पण रिलायन्स आणि एल अँड टी या हेविवेट शेअर्स घसरणीमुळे सेन्सेक्स डळमळीत झाला.

‘हे’ शेअर्स गडगडले

सेन्सेक्स आज ७३,९९३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,५१५ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिडचा शेअर्स टॉप लूजर्स ठरला. हा शेअर्स ७ टक्क्यांनी घसरून २६३ रुपयांवर आला. एनटीपीसी आणि टाटा स्टील हे शेअर्स प्रत्येकी ६ टक्क्यांनी घसरले. टाटा मोटर्स, टायटन, भारतीय एअरटेल, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलटी, एम अँड एम, सन फार्मा, इंडसइंड बँक विप्रो हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांदरम्यान घसरले. दरम्यान, आयटीसीचा शेअर्स टॉप गेनर्स ठरला. हा शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढून ४२३ रुपयांवर पोहोचला. कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स किरकोळ वाढले.

निफ्टी आज २२,४३२ वर खुला झाला होता. त्यानंतर निफ्टी २१,९०५ पर्यंत खाली आला. निफ्टीवर कोल इंडिया, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, एनटीपी हे ६ ते ८ टक्क्यांदरम्यान घसरले. तर आयटीसी, कोटक बँक यात वाढ दिसून आली.

अदानींचे शेअर्स गडगडले

अदानी समुहातील सर्व १० शेअर्स आज मोठी घसरण दिसून आले. त्यांचे काही शेअर्स १३ टक्क्यांपर्यंत घसरले. यामुळे दुपारपर्यंत त्यांच्या एकत्रित बाजार भांडवलातून सुमारे ९० हजार कोटी रुपये उडाले. NSE वर अदानी ग्रीन एनर्जी १३ टक्क्यांनी कमी होऊन १,६५० रुपयांच्या इंट्राडे निचांकावर आला. अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स हे ही प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीदेखील भारतीय शेअर्स खरेदी करण्याकडे वळले आहेत. त्यांना या महिन्यात आतापर्यंत ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पण बाजारातील आजच्या घसरणीला देशांतर्गत घटक कारणीभूत ठरले आहेत. (Stock Market Crash)

‘सेबी’चा इशारा

गेल्या महिन्यात म्युच्युअल फंडांना स्मॉलकॅप आणि मिडकॅप गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक प्रणाली लागू करण्यास सांगितल्यानंतर सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी आता कठोर इशारा दिला आहे. त्यांनी सोमवारी बोलताना स्मॉल आणि मिड-कॅप शेअर्सच्या वाढलेल्या मूल्यांकनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. याचे पडसाद बाजारात उमटत आहेत.

महादेव बेटिंग ॲप प्रकरण

कोट्यवधी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेकायदेशीर बेटिंग ॲप घोटाळा प्रकरणाच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दुबईस्थित कथित हवाला ऑपरेटर हरी शंकर टिब्रेवाला यांच्या डिमॅट खात्यांमध्ये असलेले १,१०० कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. ईडीने टिब्रेवालाच्या दोन प्रमुख साथीदारांना अटक केली आहे आणि त्याच्याशी संबंधित १३ संस्थांची मालमत्ताही जप्त केली आहे. यामुळे टिब्रेवालाची ज्या स्मॉलकॅप शेअर्समध्ये हिस्सेदारी होती. त्यात विक्रीचा सपाटा सुरु आहे. सिगाची इंडस्ट्रीज, जेनसोल इंजिनिअरिंग, विकास इकोटेक, टोयाम स्पोर्ट्स, एलकेपी फायनान्स इत्यादी सारख्या ३० हून अधिक सूचीबद्ध शेअर्समध्ये टिब्रेवाला आणि त्यांच्या संस्थांची हिस्सेदारी होती. ईडीच्या कारवाईनंतर यातील बहुतांश शेअर्स घसरले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button