पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली-एनसीआरमध्ये बनावट औषधे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट कॅन्सर औषधांची निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून त्यात दिल्लीतील एका प्रसिद्ध कॅन्सर रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कॅन्सरचे बनावट औषधांचे इंजेक्शन १ लाख ९६ हजार रुपयांना विकले जात होते. ही औषधे देशातच नव्हे तर चीन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही पुरवली जात होती. गुन्हे शाखेने आरोपींच्या ताब्यातून ८९ लाख रुपये रोख, १८ हजार रूपयांचे डॉलर्स आणि ४ कोटी रुपयांची ७ आंतरराष्ट्रीय आणि २ भारतीय ब्रँडची बनावट कॅन्सरची औषधे जप्त केली आहेत.
विशेष गुन्हे शाखेच्या सीपी शालिनी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांच्या तपासानंतर त्यांच्या टीमने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने दिल्ली-एनसीआरमध्ये एकाच वेळी ७ ते ८ ठिकाणी छापे टाकले. छाप्यादरम्यान मोती नगर येथील डीएलएफ कॅपिटल ग्रीन्सच्या दोन फ्लॅटमध्ये बनावट औषधे पकडण्यात आली.
हेही वाचा :