पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रिम कोर्टाने एका निकालाने एका पुरुषावरील बलात्काराचा गुन्हा रद्द केला आहे. या पुरुषावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद केला होता. पण या प्रकरणातील फिर्यादी महिला ही आधीच विवाहित आहे त्यामुळे विवाहाचे वचन देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. (Supreme Court)
न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार आणि राजेश बिंदाल यांनी हा निर्णय दिला आहे. त्यांनी हा निकाल देताना उच्च न्यायालयाने कलम ३७६ (२) आणि कलम ५०६ नुसार दिलेला निकाल रद्दबातल ठरवला आहे. (Supreme Court)
फिर्यादी महिलेने म्हटले आहे की, "संबंधित पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवले. या पुरुषाने लग्न करतो आणि मुलाचा सांभाळ करतो असे वचन दिले होते." या पुरुषाने लग्नाचे वचन दिल्याने पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि एका मंदिरात या पुरुषाशी २०१९ला लग्नही केले होते, असे फिर्यादीत म्हटले होते. ही घटना २०१९ची आहे. त्यानंतर काही काळाने या पुरुषाने कामाच्या निमित्ताने बाहेर गावी गेला आणि त्यानंतर सातत्याने हा महिलेला टाळू लागला, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
सुप्रिम कोर्टाने फिर्यादी महिलेने जी माहिती सादर केली होती, त्यातील विरोधाभास दाखवून दिला. पहिल्या नवऱ्यापासून २०१८ला घटस्फोट घेतला असे ती म्हणत असली तरी घटस्फोटाची निवाडा हा २०२१चा आहे. त्यामुळे यापूर्वी म्हणजे २०१९ला तिने या पुरुषाशी लग्न केले होते, हे सिद्ध होत नाही. तसेच महिलेचे वय संबंधित पुरुषापेक्षा १० वर्षांनी जास्त आहे, ती अल्पवयीन नाही, आणि आपल्या निर्णयाचे पुढे काय परिणाम होणार आहेत, याची तिला जाणीव नव्हती असे म्हणता येत नाही, असेही सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. विवाहित असताना तिने परपुरुषाशी संबंध ठेवले, म्हणजे ती तिच्या नवऱ्याला फसवत होती, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
हेही वाचा